आंबेनळी घाट पुन्हा हादरला!अलिबागच्या युवकाने आजीचा खून करून मृतदेह खोल दरीत फेकल्याची कबुली; प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून मृतदेह बाहेर

आंबेनळी घाट पुन्हा हादरला!

अलिबागच्या युवकाने आजीचा खून करून मृतदेह खोल दरीत फेकल्याची कबुली; प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून मृतदेह बाहेर

प्रतापगड प्रतिनिधी :

आंबेनळी घाट पुन्हा एकदा गंभीर गुन्हेगारी घटनेमुळे चर्चेत आला असून पोलादपूर तालुक्याच्या हद्दीतील बावली टोक ते दाभिल टोक दरम्यान खोल दरीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अलिबाग येथील एका युवकाने स्वतःच्या आजीचा खून करून तिचा मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाने दोन दिवसांपूर्वी आपल्या आजीचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीमध्ये फेकून दिला होता. या प्रकरणाचा तपास करताना अलिबाग पोलिसांनी संशयित युवकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून मृतदेह ज्या ठिकाणी फेकून दिला होता ते ठिकाणही पोलिसांना दाखवले.

यानंतर अलिबाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आंबेनळी घाटातील धोकादायक आणि अतिशय खोल दरीमुळे मृतदेह बाहेर काढण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. यावेळी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी धाडसी रेस्क्यू मोहीम राबवत खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले. या मोहिमेदरम्यान मोठी खबरदारी घेण्यात आली.

दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आंबेनळी घाट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच या घाटात भीषण अपघात होऊन आठ युवकांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची आठवण अद्याप ताजी असतानाच आता खून प्रकरण समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे यापूर्वीही आंबेनळी घाटातील याच परिसरात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याची घटना घडली होती. त्यामुळे हा परिसर पुन्हा एकदा गूढ आणि गंभीर घटनांमुळे चर्चेत आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलीस करीत आहेत.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl