महाबळेश्वर आगाराला ‘राजमाता जिजाऊ’ बसेसची नवी ताकद; अजितदादा संकपाळ यांच्या पाठपुराव्याला यश, पर्यटन वाहतुकीला मिळणार नवी गती

महाबळेश्वर आगाराला ‘राजमाता जिजाऊ’ बसेसची नवी ताकद; अजितदादा संकपाळ यांच्या पाठपुराव्याला यश, पर्यटन वाहतुकीला मिळणार नवी गती

प्रतापगड प्रतिनिधी : 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त महाबळेश्वर आगारात तब्बल १० नवीन अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्याने संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. डोंगररांगांनी वेढलेल्या आणि वर्षभर पर्यटकांनी गजबजलेल्या महाबळेश्वर तालुक्यासाठी या बसेस मोठा दिलासा ठरणार असून, स्थानिक नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि पर्यटकांना आता अधिक सुरक्षित व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील वाढती प्रवासी संख्या, घाटरस्त्यांवरील सततचा ताण आणि जुन्या बसेसची वारंवार होणारी बिघाडाची समस्या यामुळे अनेक दिवसांपासून नव्या बसेसची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषद सदस्य तथा कृषि समिती सदस्य श्री. अजित रामचंद्र संकपाळ यांनी परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे अधिकृत पत्राद्वारे महाबळेश्वर आगारासाठी नवीन बसेसची मागणी केली होती. त्यांनी पत्रात महाबळेश्वर, प्रतापगड, तापोळा, पाचगणी, पार-पार यांसारख्या पर्यटनस्थळांवर दरवर्षी लाखो पर्यटक येत असल्याचा उल्लेख करत तालुक्याच्या डोंगराळ भौगोलिक परिस्थितीमुळे एस.टी. वाहतुकीवर प्रचंड ताण येत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

सदर पत्रामध्ये महाबळेश्वर आगारातील अनेक बसेस १२ लाख किलोमीटरपेक्षा अधिक धावलेल्या असून घाटरस्त्यांवर वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले होते. या परिस्थितीमुळे महामंडळालाही आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याने महाबळेश्वर आगारासाठी २५ ‘राजमाता जिजाऊ’ बसेस व १० मिनी बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची गंभीर दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर आगारासाठी पहिल्या टप्प्यात १० नवीन बसेस मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

एस.टी. महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नव्या बसेसचे विधिवत पूजन करण्यात आले. ज्येष्ठ प्रवाशांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रवासी, नागरिक आणि एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

नव्याने दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून घाटमाथ्यावरील वळणदार रस्त्यांवर सुरक्षित प्रवासासाठी त्या विशेष सक्षम मानल्या जात आहेत. पर्यटन हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता या बसेस महाबळेश्वर आगारासाठी मोठी ताकद ठरणार आहेत. यामुळे पर्यटन सेवेला गती मिळण्यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे राजुशेठ राजपुरे, जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, पंचायत समिती सभापती शकुंतला चोरमले, उपसभापती संजय मोरे, आगार व्यवस्थापक महेश जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच एस.टी. कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते.

महाबळेश्वर तालुक्याच्या वाहतूक व्यवस्थेसाठी ही बससेवा भविष्यात महत्त्वाची ठरणार असून, पुढील काळात आणखी बसेस उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl