महाबळेश्वरात संत रोहिदास समाज फाऊंडेशनचा भव्य विद्यार्थी गुणगौरव सोहळा; शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संगम


महाबळेश्वरात संत रोहिदास समाज फाऊंडेशनचा भव्य विद्यार्थी गुणगौरव सोहळा; शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संगम

कुंभरोशी प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी येथे संत रोहिदास समाज फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६” उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात संपन्न झाला. “।। एक समाज - एक दिशा ।।” या ब्रीदवाक्याखाली आयोजित या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षणासोबत संस्कार, सामाजिक जाणीव आणि समाज एकजुटीचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

कुंभरोशी येथील राजनंदिनी पॅलेस येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. ज्ञानेश्वर वर्पे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. नंदकिशोर चंदन यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणाचे महत्त्व अत्यंत प्रभावी शब्दांत विशद केले. “शिक्षण हेच व्यक्तिमत्त्व घडविण्याचे सर्वात मोठे साधन आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यातील पुढील पाच वर्षे पूर्ण समर्पणाने आणि मेहनतीने घालवली, तर कोणतीही स्वप्ने अशक्य राहत नाहीत,” असे ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्य, प्रामाणिकपणा, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

यावेळी यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवडी (सातारा) येथील जीवन बोराटे आणि समता माने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरच्या विविध संधी, सामाजिक कार्याचे महत्त्व आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची ताकद यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. अजित रामचंद्र संकपाळ, महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती मा. श्री. संजय हरिश्चंद्र मोरे ,भाजप तालुकाध्यक्ष बबन उतेकर, श्री राम वर्दायनी जंगल कामगार सोसायटीचे चेअरमन सुरेश जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग कारंडे गुरुजी, ज्येष्ठ समाजसेवक सदाशिव कारंडे, मा. श्री. रविंद्र सदाशिव बुरंगले (सर), आरोग्य विभागाचे मा. श्री. तेजस रणपिसे, तसेच मुख्याध्यापिका सौ. वैशाली जनार्दन कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संत रोहिदास समाज फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. संपत धोंडिबा कदम, खजिनदार श्री. प्रशांत पांडुरंग कारंडे, कार्याध्यक्ष श्री. महेंद्र सदाशिव कारंडे आणि सचिव श्री. जितेंद्र तानाजी कारंडे यांनी विशेष मेहनत घेतली. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी मोठे योगदान दिले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बाजीराव कारंडे यांनी केले, तर उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार सचिव जितेंद्र कारंडे यांनी मानले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, प्रेरणादायी मार्गदर्शन आणि समाजातील ऐक्याचा संदेश देणारा हा गुणगौरव सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl