सह्याद्रीच्या कुशीत विकासाचा ‘सुवर्णदुवा’; तापोळा-अहिर पूल ठरणार पर्यटन, रोजगार आणि कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सह्याद्रीच्या कुशीत विकासाचा ‘सुवर्णदुवा’; तापोळा-अहिर पूल ठरणार पर्यटन, रोजगार आणि कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रतापगड प्रतिनिधी :
सह्याद्रीच्या दुर्गम भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणाऱ्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी महाबळेश्वर तालुक्यात दौरा केला. दरेगाव येथील हनुमान मंदिर उद्घाटनापासून सुरू झालेल्या या दौऱ्यात त्यांनी अहिरे-वाणवली येथील काळेश्वरी मंदिराचे उद्घाटन केले तसेच तापोळा-अहिर दरम्यान उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी पुलाची प्रत्यक्ष पाहणी करत कामाचा आढावा घेतला.
सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागासाठी जीवनवाहिनी ठरणाऱ्या या पुलाचे तब्बल ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील एका महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. या पुलामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील संपर्क अधिक जलद व सुलभ होणार असून, नागरिकांचा मोठा प्रवासाचा वळसा कायमचा कमी होणार आहे.
कोयना जलाशयाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेला हा पूल केवळ वाहतुकीचा दुवा न राहता पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठे आकर्षण ठरणार आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना आकर्षक व्ह्यूइंग गॅलऱ्या उभारण्यात येत असून, येथून पर्यटकांना सह्याद्री पर्वतरांगा, विस्तीर्ण जलाशय आणि हिरवाईने नटलेल्या परिसराचे विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे. त्यामुळे तापोळा परिसराला पर्यटन नकाशावर नवी ओळख मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, या पुलामुळे सुमारे ४५ ते ५० किलोमीटरचा वळसा थेट वाचणार आहे. तसेच कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी कनेक्टिव्हिटी मजबूत झाल्याने जवळपास ८० ते ९० किलोमीटर अंतराची बचत होणार आहे. त्यामुळे वेळ, इंधन आणि वाहतूक खर्चात मोठी घट होणार असून, प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल. दुर्गम भागातील गावांना आता मुख्य बाजारपेठांशी आणि शहरांशी अधिक वेगाने संपर्क साधता येणार आहे.
महाबळेश्वर, तापोळा, वासोटा आणि कोयना परिसर पर्यटनासाठी अधिक विकसित करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुनावळे येथे आधुनिक वॉटर स्पोर्ट्स प्रकल्प विकसित करण्यात येत असून, मुनावळे ते वासोटा दरम्यान रोपवे उभारण्याची योजना पुढे नेली जात आहे. तसेच उचाट परिसरात भव्य बोटॅनिकल गार्डन विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे. या सर्व प्रकल्पांमुळे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यास मदत होणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या विकासकामांमुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगारनिर्मितीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. होम स्टे व्यवसाय, पर्यटन मार्गदर्शन, बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स, सेंद्रिय शेती, बांबू उद्योग आणि स्थानिक हस्तकला व्यवसायांना या प्रकल्पांमुळे नवे बळ मिळणार आहे. त्यामुळे रोजगारासाठी शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होऊन युवकांना गावातच रोजगार उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अहिरे-वाणवली येथील ज्येष्ठ नागरिक दगडू दादा सपकाळ यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर काळेश्वरी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होत स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. विविध विकासकामांबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले.
या पाहणीवेळी जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संजय मोरे, पंचायत समिती सदस्य संजय शेलार, सुभाष कारंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता देशपांडे तसेच स्थानिक पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, अलीकडील शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेचाही उल्लेख उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. आपल्या हेलिकॉप्टरच्या आपत्कालीन लँडिंगप्रकरणी पंतप्रधानांनी आपुलकीने विचारपूस करत काळजी घेण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
तापोळा-अहिर पूल अंतिम टप्प्यात पोहोचल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात विकासाच्या नव्या पर्वाची आशा निर्माण झाली असून, हा पूल भविष्यात पर्यटन, व्यापार, रोजगार आणि ग्रामीण विकासासाठी सह्याद्रीतील महत्त्वाचा ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment