हरिनामाच्या गजरात वेंगळे भक्तिमय; श्री वेंगुळेश्वर महादेव मंदिराचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार
हरिनामाच्या गजरात वेंगळे भक्तिमय; श्री वेंगुळेश्वर महादेव मंदिराचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार
महाबळेश्वर तालुक्यातील वेंगळे येथील ग्रामदैवत असलेल्या श्री वेंगुळेश्वर महादेव मंदिराच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दि. ११ मे २०२६ रोजी विविध धार्मिक आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थ मंडळ वेंगळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात श्री सत्यनारायण महापूजा, रुद्राभिषेक, नामजप, हरिपाठ, कीर्तन तसेच महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
वेंगळे गावातील श्री वेंगुळेश्वर महादेव मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. गेल्या काही वर्षांत मंदिर परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना मोठी चालना मिळाली असून ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. यंदा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मंदिर परिसर आकर्षक सजावटीने नटविण्यात आला असून भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सोमवारी सकाळी रुद्राभिषेक आणि नामजपाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. दुपारी श्री सत्यनारायण महापूजा व आरती संपन्न होणार असून सायंकाळी हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. आनंद महाराज कदम (आपटी) आणि सहकारी यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम रंगणार असून हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेंगळे गावासह पंचक्रोशीतील नागरिक, युवक आणि महिला मंडळे या सोहळ्याच्या तयारीत उत्साहाने सहभागी झाली असून मंदिर परिसरात स्वच्छता, सजावट आणि नियोजनाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
“धार्मिक परंपरा जपत ग्रामएकता आणि भक्तीभाव वृद्धिंगत करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व मोठे आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच सर्व भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून तिर्थ-प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री वेंगुळेश्वर महादेव मंदिर ग्रामस्थ मंडळ वेंगळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment