नाकिंदा उर्दू शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ; शैक्षणिक साहित्य वितरणाबद्दल मान्यवरांचा गौरव

नाकिंदा उर्दू शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ; शैक्षणिक साहित्य वितरणाबद्दल मान्यवरांचा गौरव

महाबळेश्वर प्रतिनिधी :

महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, नाकिंदा येथे इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. याच कार्यक्रमात शाळेला विविध शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल मान्यवरांचे आभार प्रदर्शनही करण्यात आले. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने सर्वांच्या मनाला स्पर्श केला.

या कार्यक्रमाला मेटगुताड केंद्राचे माजी केंद्रप्रमुख तथा शिवसेना तालुकाप्रमुख महाबळेश्वर श्री संभाजी भिलारे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुरेंद्र भिलारे, नाकिंदा ग्रामपंचायत सदस्य श्री जहीरभाई डांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री अफजलभाई खारकंडे, भेकवली उर्दू शाळेचे मुख्याध्यापक व उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री नासिर वारुणकर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शाहिस्ता मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात कु. जैनब खारकंडे हिने तिलावते कुराण सादर करून केली. त्यानंतर हमद व नात सादर करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

इयत्ता पाचवी व सहावीतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सातवीतील विद्यार्थ्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी शेर-शायरीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी बहुमोल मार्गदर्शन केले.

यानंतर इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. या उपक्रमाचे प्रमुख पाहुणे, ग्रामपंचायत सदस्य, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विशेष कौतुक केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. काही विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना भावुक झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे काही काळ सभागृहात शांत वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांनी मराठी भाषेत मनोगत व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली.

पालकांनी आपल्या मनोगतात शिक्षकांचे आभार मानले. श्री संभाजी भिलारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या मराठी भाषेतील सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. श्री सुरेंद्र भिलारे यांनी इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्याच्या उपक्रमाचे अभिनंदन केले. तसेच श्री नासिर वारुणकर व श्री जहीरभाई डांगे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमातील आणखी एक विशेष बाब म्हणजे इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी शाळेला शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी मोठे पातेले भेट म्हणून दिले. विद्यार्थ्यांच्या या सामाजिक जाणिवेच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

दरम्यान, नाकिंदा शाळेला सन ज्वेल्स कंपनीचे च डायरेक्टर श्री शिशिर निव्हेटिया यांच्या मार्फत तसेच श्री संभाजी भिलारे यांच्या सहकार्याने अंदाजे एक लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य देण्यात आले होते. यात संगणक, प्रिंटर, ग्रीन बोर्ड, बुककेस आणि पुस्तके यांचा समावेश होता. तालुक्यातील काही इतर शाळांनाही असे साहित्य वितरित करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने श्री संभाजी भिलारे यांचे विशेष आभार मानण्यात आले तसेच भविष्यातही असेच सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री वसीम वारुणकर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl