“करकश सायलेंसरवाल्यांनो सावधान!” महाबळेश्वर पोलिसांचा धडक ॲक्शन ; जागेवरच सायलेंसर जप्त करत ठोठावली कारवाई
“करकश सायलेंसरवाल्यांनो सावधान!” महाबळेश्वर पोलिसांचा धडक ॲक्शन ; जागेवरच सायलेंसर जप्त करत ठोठावली कारवाई
महाबळेश्वर | प्रतिनिधी
पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि ध्वनीप्रदूषणाला खतपाणी घालणाऱ्या बेकायदेशीर करकश आवाजाच्या सायलेंसरविरोधात महाबळेश्वर पोलीस प्रशासन आणि ट्रॅफिक पोलिसांनी धडक कारवाई करत नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना चांगलाच दणका दिला आहे. विशेष तपासणी मोहीम राबवत पोलिसांनी मोठ्या आवाजाचे मॉडिफाईड सायलेंसर बसवून शहरात बिनधास्त फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली असून अनेक वाहनांचे बेकायदेशीर सायलेंसर जागेवरच जप्त करण्यात आले.
महाबळेश्वरमध्ये वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, पर्यटनस्थळ परिसर तसेच निवासी भागात काही युवकांकडून दुचाकींना नियमबाह्य बदल करून मोठ्या आवाजाचे सायलेंसर बसवले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार पोलीस प्रशासनाकडे करण्यात येत होत्या. या करकश आवाजामुळे नागरिक, पर्यटक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही समोर आले होते.
या पार्श्वभूमीवर ट्रॅफिक पोलिसांनी शहरातील विविध भागात विशेष नाकाबंदी आणि तपासणी मोहीम राबवली. यावेळी वाहनांची सखोल तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करत नियमबाह्य सायलेंसर बसवलेल्या दुचाकींवर तत्काळ कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनधारकांना दंडात्मक कारवाईसह वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत समज देण्यात आली. काही ठिकाणी पोलिसांनी वाहनांचे सायलेंसर काढून थेट जप्त केल्याने वाहनचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरातील ध्वनीप्रदूषणाला आळा बसण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. “मोठ्या आवाजाचे सायलेंसर हे केवळ स्टाईलचे प्रतीक नसून ते इतरांसाठी त्रासदायक आणि धोकादायक ठरू शकतात. अशा प्रकारच्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढतो तसेच सार्वजनिक शांततेलाही बाधा पोहोचते,” असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.
याचबरोबर नो-एंट्रीमध्ये वाहन घालणे, नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही अशाच पद्धतीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पर्यटनस्थळ म्हणून महाबळेश्वरची प्रतिमा स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
महाबळेश्वर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, “वाहन चालवताना नियम काय असतात आणि त्यांचे उल्लंघन केल्यास काय परिणाम होऊ शकतात, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि जबाबदार वाहनचालकांना प्रोत्साहन, या दुहेरी भूमिकेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक शिस्त लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment