वाढदिवसानिमित्त लोकसेवेचा आदर्श; महाबळेश्वरमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वाढदिवसानिमित्त लोकसेवेचा आदर्श; महाबळेश्वरमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतापगड | प्रतिनिधी :

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनिल लक्ष्मण शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शिबिराच्या पहिल्याच टप्प्यात १०० पेक्षा अधिक रुग्णांनी नेत्र तपासणी करून घेतली आहे. सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, अजूनही अनेक नागरिक शिबिरस्थळी दाखल होत आहेत.

नगराध्यक्ष श्री. सुनिल दादा शिंदे मित्र परिवार, ममता ज्येष्ठ नागरिक संघ मुंबई आणि भारती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत महाबळेश्वर येथील पेटीट लायब्ररी हॉल येथे सुरू आहे. वाढदिवसानिमित्त केवळ औपचारिक कार्यक्रम न करता समाजोपयोगी उपक्रम राबवून लोकसेवेची परंपरा जपण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात आला आहे.

“दमदार पाऊल तुमचे, प्रगतीची उजळी वाट, अखंड लाभो आपणांस पाठबळाचे हात,” अशा शुभेच्छा संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, कामगार तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे शिबिर मोठा दिलासा ठरत आहे.

या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, लांब व जवळचे कमी दिसणे, सतत डोके दुखणे, डोळ्यांमध्ये मास वाढणे, डोळे लाल होणे अशा विविध नेत्रविकारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, गरजू नागरिकांना मोफत नंबरचे चष्मे जागेवरच उपलब्ध करून दिले जात असून, मोतीबिंदूग्रस्त रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित शस्त्रक्रिया भारती हॉस्पिटल येथे करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

महाबळेश्वर शहरासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेत असून, वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl