अवकाळीच्या जखमेवर मदतीची फुंकर; अभिजित चव्हाण यांनी दिला २५ हजारांचा आधार
अवकाळीच्या जखमेवर मदतीची फुंकर; अभिजित चव्हाण यांनी दिला २५ हजारांचा आधार
सातारा | प्रतिनिधी विजय जाधव :
अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालेल्या एका मेंढपाळ कुटुंबाला आधार देत शेंद्रे येथील ग्रामपंचायत अधिकारी अभिजित चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून तब्बल २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. त्यांच्या या सामाजिक जाणिवेतून केलेल्या कृतीमुळे परिसरात त्यांच्या संवेदनशीलतेचे आणि माणुसकीचे मोठे कौतुक होत आहे.
दि. १३ मे रोजी सातारा परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने अनेकांचे संसार उध्वस्त केले. कोंडवे येथील मेंढपाळ हणमंत बापू मासाळ यांच्या तब्बल २२ मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मेंढपाळी हा उदरनिर्वाहाचा एकमेव आधार असलेल्या मासाळ कुटुंबावर या घटनेमुळे मोठे आर्थिक संकट कोसळले. अचानक झालेल्या या नुकसानीमुळे संपूर्ण कुटुंब हवालदिल झाले होते. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी सहानुभूती व्यक्त केली; मात्र अभिजित चव्हाण यांनी प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकी जपली.
दि. १५ मे रोजी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी अभिजित चव्हाण यांनी वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळण्याचा निर्णय घेतला आणि तो निधी गरजू मेंढपाळ कुटुंबासाठी देण्याचे निश्चित केले. सातारा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या अभिजित चव्हाण यांनी हणमंत मासाळ यांना २५ हजार रुपयांची रोख मदत सुपूर्द करून संकटाच्या काळात आधार दिला.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले आणि सातारा पंचायत समिती सभापती महेश गाडे यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव सावंत, अजित साळुंखे, पूजा मोरे, पंचायत समिती उपसभापती सुषमा जाधव, राहुल शिंदे, प्रभाकर पवार, गटविकास अधिकारी सुशील संसारे, सहाय्यक गटविकास अधिकारी संतोष पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मूळचे महागाव येथील आणि सध्या शेंद्रे ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले अभिजित चव्हाण यांनी “उत्सवापेक्षा गरजूंना केलेली मदत हीच खरी आनंदाची बाब,” हा संदेश आपल्या कृतीतून दिला. आजच्या काळात वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे करण्याची स्पर्धा सुरू असताना त्यांनी मात्र सामाजिक उत्तरदायित्व जपत गरजू कुटुंबाच्या मदतीला धाव घेण्याचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
त्यांच्या या कृतीमुळे केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर संकटात सापडलेल्या कुटुंबाला मानसिक आधारही मिळाला असून सर्व स्तरांतून अभिजित चव्हाण यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment