महाबळेश्वर बाजारपेठेत मोकाट वळूची दहशत; पर्यटक जीव मुठीत धरून फिरताना

महाबळेश्वर बाजारपेठेत मोकाट वळूची दहशत; पर्यटक जीव मुठीत धरून फिरताना

सीझनमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त

महाबळेश्वर प्रतिनिधी :

 उन्हाळी पर्यटन हंगामामुळे सध्या पर्यटननगरी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना शहराच्या मुख्य बाजारपेठेत मोकाट फिरणाऱ्या वळू बैलामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे, मुंबईसह राज्यभरातून हजारो पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल होत असताना हा बैल बाजारपेठेत मुक्तपणे संचार करत असून अनेकांना धडक देत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पर्यटकांना अक्षरशः जीव मुठीत धरून बाजारपेठेत फिरावे लागत असल्याची प्रतिक्रिया व्यापारी आणि स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

आज भर गर्दीत एका महिलेला संबंधित बैलाने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत महिला सुदैवाने बचावली असली तरी अचानक घडलेल्या प्रकारामुळे बाजारपेठेत एकच घबराट उडाली. काही काळ पर्यटकांनी दुकाने आणि रस्त्याच्या कडेला धावाधाव करत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या मते, हा बैल गेल्या अनेक दिवसांपासून बाजारपेठेत मोकाट फिरत असून नागरिक आणि पर्यटकांसाठी गंभीर धोका निर्माण करत आहे.


व्यापाऱ्यांनी सांगितले की, पर्यटन हंगामात आधीच बाजारपेठेत मोठी गर्दी असते. त्यातच मोकाट बैल, भटकी कुत्री आणि अर्धवट रस्ते कामांमुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले असून कामे रखडल्याने वाहतूक आणि पादचारी हालचालींना अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्या वेळी अपुऱ्या लाईट व्यवस्थेमुळे नागरिकांना आणि पर्यटकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. काही भागांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावी नसल्याने सुरक्षेचा प्रश्न आणखी गंभीर बनला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, या मोकाट वळूबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. “एखादा गंभीर अपघात किंवा जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल आता नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

स्थानिक ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी संबंधित वळू बैलाला तातडीने जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी किंवा जंगल परिसरात सोडण्याची मागणी केली आहे. तसेच बाजारपेठेतील भटक्या जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, बाजारपेठेतील रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असूनही निकृष्ट दर्जाचे आणि संथ गतीने काम सुरू असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर दर्जेदार रस्ते, पुरेशी प्रकाश व्यवस्था, कार्यक्षम सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षित बाजारपेठ निर्माण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे. पर्यटननगरी महाबळेश्वरची प्रतिमा टिकवण्यासाठी प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करावी, अशी भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl