श्रीक्षेत्र महाबळेश्वर रस्ता कामाचा बोजवारा; तीन वर्षांपासून रखडलेले कॉंक्रिटीकरण, नागरिकांच्या जीविताशी खेळ
श्रीक्षेत्र महाबळेश्वर रस्ता कामाचा बोजवारा; तीन वर्षांपासून रखडलेले कॉंक्रिटीकरण, नागरिकांच्या जीविताशी खेळ
महाबळेश्वर (प्रतिनिधी) : श्रीक्षेत्र महाबळेश्वर ते महाबळेश्वर दरम्यान सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामाचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या समोर येत असून, गेल्या तब्बल तीन वर्षांपासून सुरू असलेले हे काम अद्यापही पूर्णत्वास गेले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कामाची अत्यंत संथ गती, निकृष्ट दर्जा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे प्रशासन व संबंधित ठेकेदारांविरोधात नाराजीची लाट उसळली आहे.
महाबळेश्वर तालुक्यात नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत या गंभीर प्रश्नाची थेट मांडणी नामदार मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या समोर करण्यात आली होती. यावेळी महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी १० मेपर्यंत संपूर्ण रस्ता शंभर टक्के पूर्ण करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले होते. मात्र दिलेली मुदत संपूनही प्रत्यक्षात काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत असून, नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत आहे.
विशेष म्हणजे, फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांनी नागरिकांना केवळ १५ दिवस वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची विनंती केली होती. त्यावेळी “काम जलदगतीने पूर्ण केले जाईल” असे आश्वासन देण्यात आले होते. स्थानिक नागरिकांनी मोठा त्याग करत प्रशासनाला सहकार्य केले; मात्र दोन वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही रस्ता अपूर्ण अवस्थेतच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, कामाच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. प्रत्यक्ष पाहणीअंती रस्त्याच्या अनेक भागांवर मोठ्या प्रमाणात तडे (क्रॅक) पडलेले दिसून येत असून, नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून होत असलेल्या या कामात गुणवत्तेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.
याशिवाय, अनेक धोकादायक ठिकाणी दरीलगत संरक्षण कठडे (Crash Barriers) बसविण्यात आलेले नाहीत. घाट परिसरातील तीव्र वळणांवर कोणतीही ठोस सुरक्षा उपाययोजना नसल्याने वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. अलीकडेच संरक्षण कठड्याअभावी एक गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र या घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतलेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
दररोज हजारो पर्यटक, स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिक या मार्गाचा वापर करतात. महाबळेश्वरसारख्या जागतिक पर्यटनस्थळाच्या प्रवेशमार्गाची अशी दुरवस्था प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवरही रस्त्याचे काम रखडलेले असल्याने वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांची गैरसोय दिवसेंदिवस वाढत आहे.
सदर परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली असून, जिल्हा प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच रस्ता तातडीने पूर्ण करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment