१५०० फूट खोल दरी, मधमाश्यांचे पोळे आणि मृत्यूशी झुंज; आंबेनळी घाटातील २४ तासांच्या थरारक रेस्क्यू मोहिमेची कहाणी

१५०० फूट खोल दरी, मधमाश्यांचे पोळे आणि मृत्यूशी झुंज; आंबेनळी घाटातील २४ तासांच्या थरारक रेस्क्यू मोहिमेची कहाणी

महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू, सिस्केप व एसव्हीआरएसएस टीमच्या अथक प्रयत्नांना यश; आठही मृतदेह बाहेर काढण्यात यशस्वी

प्रतापगड  प्रतिनिधी :

महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात २४ मे रोजी रात्री घडलेल्या भीषण स्कॉर्पिओ दुर्घटनेनंतर तब्बल २२ तास सुरू असलेल्या अत्यंत आव्हानात्मक बचाव आणि शोध मोहिमेला अखेर यश आले. १५०० फूट खोल दरी, निसरडा भूभाग, ओढ्याचा मार्ग, मधमाश्यांचे पोळे आणि अंधार अशा प्रतिकूल परिस्थितीत विविध बचाव पथकांनी जीवाची पर्वा न करता राबविलेल्या मोहिमेत दुर्घटनाग्रस्त आठही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले.

२४ मे रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर ट्रेकर्स टीमच्या ग्रुपवर आंबेनळी घाटात एक वाहन दरीत कोसळल्याचा संदेश प्राप्त झाला. माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिकेत वागदरे, सोमनाथ वागदरे आणि संकेत सावंत यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. प्राप्त लोकेशननुसार शोधमोहीम सुरू करण्यात आली; मात्र सुरुवातीला त्या ठिकाणी अपघाताचे कोणतेही स्पष्ट चिन्ह आढळले नाही.

त्यानंतर पथकाने पुढील भागात शोध सुरू ठेवला. एका ठिकाणी दरीत टॉर्चचा प्रकाश टाकल्यानंतर संशयास्पद स्थिती दिसून आली. दरीत एखादे वाहन असल्याचा अंदाज आल्याने अतिरिक्त मदत मागविण्यात आली. काही वेळातच इतर सदस्य आवश्यक साहित्य आणि दोरखंडांसह घटनास्थळी दाखल झाले. रोप रेस्क्यूची संपूर्ण व्यवस्था उभारून सदस्य दरीत उतरू लागले. मात्र खाली पोहोचल्यानंतर दिसलेली गाडी ही यापूर्वीच्या एका जुन्या अपघातातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा वर येऊन शोधमोहीम दुसऱ्या दिशेने सुरू करण्यात आली.

दरम्यान, महाड येथील सिस्केप टीमदेखील मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाली होती. सर्व पथके संयुक्तपणे शोधकार्य करत असताना महाबळेश्वर ट्रेकर्सचे कुमार शिंदे आणि अनिकेत वागदरे यांना एका ठिकाणी रस्त्याकडील सूचना फलक वाकलेला दिसला. त्यानंतर त्यांनी त्या भागाची बारकाईने पाहणी केली. वाकलेली झाडे आणि तुटलेल्या फांद्या पाहून वाहन याच मार्गाने दरीत कोसळल्याचा संशय बळावला. पुढे काही अंतरावर वाहनाचा आरसा आणि त्यानंतर मोबाईल फोन आढळून आल्याने दुर्घटनास्थळ निश्चित झाले.

या ठिकाणाहून खाली तब्बल १५०० फूट खोल दरी होती. अत्यंत सावधगिरीने सदस्य एक-एक टप्पा पार करत खाली उतरू लागले. मुख्य रस्त्यापासून सुमारे २५० फूट खाली दोन मृतदेह आढळून आले. त्यानंतर शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. पहिल्या दोन मृतदेहांना जीप लाईनच्या साहाय्याने सुरक्षितपणे वर आणण्यात आले.

यानंतर बचाव पथकांनी रणनीतीत बदल करत दोन दिशांनी शोधमोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. काही सदस्य दाभिळ गावाच्या मार्गाने दरीच्या तळाकडे रवाना झाले. प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि एसव्हीआरएसएस कोलाडच्या सदस्यांनी दाभिळ गावाजवळील ओढ्यातून शोधकार्य सुरू केले, तर सिस्केप टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य मुख्य रस्त्याच्या बाजूने रेस्क्यू ऑपरेशन राबवत होते.

मध्यरात्री सुमारे १२ वाजता दोन मृतदेह पॅक करून ओढ्याच्या मार्गाने खाली आणण्यास सुरुवात करण्यात आली. ज्या ठिकाणी वाहन कोसळले होते त्या परिसरात सर्व मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत होते. याच परिसरातील एका झाडावर मोठे मधमाश्यांचे पोळे असल्याने बचावकार्यात अतिरिक्त धोका निर्माण झाला होता. याशिवाय ओलसर आणि निसरड्या वाटांमुळे प्रत्येक पाऊल अत्यंत जपून टाकावे लागत होते.

दुपारी साडेएक वाजता पाचवा मृतदेह पॅक करून खाली पाठविण्यात आला. त्यानंतर दुपारी ३ वाजता सहावा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. ओढ्याचा अवघड मार्ग आणि घसरडा भूभाग यामुळे बचावकार्याची गती मंदावत होती; मात्र पथकांनी संयम आणि चिकाटी कायम ठेवली. सायंकाळी ७.१५ वाजता सातवा आणि रात्री ८ वाजता आठवा मृतदेहही दरीतून बाहेर काढण्यात आला. अशा प्रकारे सलग २४ तास सुरू असलेल्या या अत्यंत कठीण मोहिमेची यशस्वी सांगता झाली.

या संपूर्ण बचाव मोहिमेत महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, सिस्केप महाड आणि एसव्हीआरएसएस कोलाड या पथकांनी समन्वयाने काम करत अपूर्व धैर्य आणि सेवा भावाचे दर्शन घडविले. जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवक आणि बचाव जवानांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. आंबेनळी घाटातील ही मोहीम सह्याद्रीच्या कुशीत पार पडलेल्या सर्वांत आव्हानात्मक आणि धाडसी बचावकार्यातील एक म्हणून ओळखली जाईल, अशी भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.-----------------------------------------------

या जवानांनी पार पाडली जीव धोक्यात घालणारी मोहीम

आंबेनळी घाटातील २२ तासांच्या या अत्यंत कठीण आणि धोकादायक बचाव मोहिमेत महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, सिस्केप महाड आणि एसव्हीआरएसएस कोलाडच्या सदस्यांनी रात्रंदिवस अथक परिश्रम घेतले. अंधार, खोल दरी, निसरडा भूभाग, ओढ्याचे प्रवाह आणि मधमाश्यांच्या पोळ्यांसारख्या संकटांशी सामना करत या जवानांनी आठही मृतदेह बाहेर काढण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.


महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील बाबा भाटिया, अनिल केळगणे, सुनील केळगणे, जयवंत बिरामणे, अमित कोळी, सुजित कोळी, सोमनाथ वागदरे, सौरभ गोळे, सौरव सालेकर, अक्षय नाविलकर, कुमार शिंदे, मंगेश सालेकर, दीपक ओंबळे, आदित्य रांजणे, भाऊ सपकाळ, सूर्यकांत शिंदे, अनिल लांगी आणि प्रज्वल केळगणे यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.


प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अनिकेत वागदरे, आशिष बिरामणे, अजित जाधव, ऋषिकेश जाधव, संकेत सावंत, मुन्ना उतेकर, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, मयूर जाधव, ओमकार सोनावणे आणि निखिल सावंत यांनीही जीवाची पर्वा न करता बचावकार्य केले.


तसेच सिस्केप टीम महाड आणि एसव्हीआरएसएस कोलाडच्या सदस्यांनीही दरीच्या तळापासून मुख्य रस्त्यापर्यंत समन्वय साधत महत्त्वपूर्ण योगदान दिले. सर्व पथकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच ही अत्यंत आव्हानात्मक मोहीम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकली.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl