“‘मोरया चा पेढा’ विकासाला वनविभागाचा ब्रेक?; कुंभरोशी ग्रामस्थांचा संतप्त सवाल – पर्यटन विकास रोखण्यामागे नेमकं काय?”
“‘मोरया चा पेढा’ विकासाला वनविभागाचा ब्रेक?; कुंभरोशी ग्रामस्थांचा संतप्त सवाल – पर्यटन विकास रोखण्यामागे नेमकं काय?”
प्रतापगड प्रतिनिधी :
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुंभरोशी गावातील “मोरया चा पेढा” या निसर्गरम्य ठिकाणाच्या पर्यटन विकासाच्या प्रस्तावाला सातारा वनविभागाने नकारात्मक भूमिका घेतल्याने ग्रामस्थ आणि युवकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून ग्रामस्थ, युवक आणि संयुक्त वनव्यवस्थापन समिती सातत्याने या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी प्रयत्न करत असतानाही वनविभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
प्रतापगड पायथ्यालगत स्वागत कमानीजवळील “मोरया चा पेढा” परिसर हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असून येथे प्रेक्षणीय स्थळ विकसित झाल्यास महाबळेश्वर-प्रतापगड पर्यटन साखळीत आणखी एक आकर्षण निर्माण होऊ शकते, असा ग्रामस्थांचा विश्वास आहे. यामुळे स्थानिक युवकांना रोजगार, महिला बचतगटांना व्यवसाय, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ आणि संपूर्ण गावाच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकते. मात्र वनविभागाने “तीव्र कडाभाग आणि संभाव्य जीवितहानी” या कारणावर प्रस्ताव अयोग्य ठरविल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांच्या मते, प्रतापगड, महाबळेश्वर आणि आसपासच्या पर्यटनस्थळांमध्ये अनेक धोकादायक दऱ्या, घाट आणि कड्यालगतचे पॉईंट्स विकसित करण्यात आले आहेत. तेथे सुरक्षा रेलिंग, संरक्षण भिंती, सूचना फलक, सुरक्षा रक्षक आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून पर्यटकांची सुरक्षितता राखली जाते. मग कुंभरोशीच्या बाबतीतच वनविभाग एवढी कठोर भूमिका का घेत आहे? असा सवाल युवकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, ग्रामपंचायत कुंभरोशीने तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समितीने अनेक वेळा वनविभागाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही सकारात्मक दिशा मिळाली नसल्याची चर्चा आहे. उलट, ग्रामस्थांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याशी उपेक्षित वागणूक दिली जात असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. “गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या युवकांचा उत्साहच मोडण्याचे काम वनविभाग करत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
वनविभागाच्या पत्रामध्ये संयुक्त पाहणीसाठी ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित माहिती वेळेत आणि योग्य पद्धतीने पोहोचलीच नव्हती. काही जण उपस्थित राहू शकले नाहीत म्हणून संपूर्ण गावाच्या पर्यटन विकासाच्या स्वप्नावर पाणी फेरणे अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यात विविध महा वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून पर्यटन कर आणि विविध उत्पन्नाचे स्रोत कार्यरत आहेत. अशात कुंभरोशीमध्ये आणखी एक व्यवस्थापन समिती सक्षम झाली तर विद्यमान व्यवस्थांवर परिणाम होईल की काय, या भीतीपोटी हा प्रस्ताव मुद्दाम लांबवला जात असल्याचा संतप्त आरोप युवकांकडून होत आहे. “पर्यटन विकासाला प्रोत्साहन देण्याऐवजी काही मंडळींच्या हितसंबंधांचे रक्षण केले जात आहे का?” असा थेट सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत.
स्थानिक युवकांच्या मते, “मोरया चा पेढा” हा केवळ पर्यटन प्रकल्प नाही, तर गावाच्या भविष्यासाठीचा आशेचा किरण आहे. महाबळेश्वर आणि प्रतापगड परिसरात लाखो पर्यटक येतात; मात्र कुंभरोशीसारखी गावे अजूनही मूलभूत रोजगाराच्या संधींपासून वंचित आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून गावाचा आर्थिक विकास घडवून आणण्याचा प्रयत्न होत असताना वनविभागाकडून होणारी चालढकल संतापजनक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांनी आता या प्रश्नावर अधिक आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले असून, वनमंत्री, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ वनअधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून ग्रामस्थांची बाजू ऐकावी, अशी मागणी जोर धरत आहे. “जर खरोखरच सुरक्षेचा प्रश्न असेल तर सुरक्षित विकास आराखडा तयार करा; पण विकासच रोखू नका,” अशी ठाम भूमिका स्थानिकांनी मांडली आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या या निसर्गरम्य परिसराच्या विकासाचा प्रश्न आता केवळ पर्यटनापुरता मर्यादित राहिला नसून तो स्थानिकांच्या स्वाभिमान, रोजगार आणि गावाच्या भवितव्याशी जोडला गेला आहे. त्यामुळे वनविभागाची भूमिका आणि “मोरया चा पेढा” विकासाचा मुद्दा येत्या काळात अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
Comments
Post a Comment