सौंदरी गावावर वादळी पावसाचा कहर; घरांची पडझड, कलमी आंब्यांसह शेतीचे मोठे नुकसान
सौंदरी गावावर वादळी पावसाचा कहर; घरांची पडझड, कलमी आंब्यांसह शेतीचे मोठे नुकसान
तापोळा | प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील सौंदरी गावासह परिसरात शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कलमी आंब्यांच्या बागांसह भाजीपाल्याच्या शेतीचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली असून वीजवाहिन्यांवर झाडे कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.
वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी घरांची छपरे उडाली तर काही घरांची भिंत कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कलमी आंब्यांची झाडे मुळासकट उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच भाजीपाला शेतीही पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गावातील अनेक रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून काही भागांचा संपर्कही तात्पुरता तुटला आहे. जनावरांचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. अन्न, पाणी आणि निवाऱ्याच्या मूलभूत गरजांसाठी अनेक कुटुंबांना संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. बाधित भागांचा त्वरित पंचनामा करून नुकसानीचे अचूक मूल्यांकन करावे, प्रभावित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, घरांची पडझड झालेल्यांना निवारा व पुनर्वसन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच वीज, पाणी आणि रस्ते व्यवस्था तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
“ही वेळ केवळ पाहणी करण्याची नसून त्वरित कृती करण्याची आहे. प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करून बाधित जनतेला दिलासा द्यावा,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. संकटाच्या या काळात प्रशासन जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यासच नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment