“प्रतापगडाचे संवर्धन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वैभव जपतच होणार”; पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची स्पष्ट भूमिका
प्रतापगड | प्रतिनिधी
ऐतिहासिक वारसा, स्वराज्याचा अभिमान आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या किल्ले प्रतापगड येथे सुरू असलेल्या संवर्धन आणि विकासकामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज प्रत्यक्ष पाहणी दौरा करत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर आढावा बैठक घेतली. “प्रतापगडाच्या संवर्धनाच्या कामात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्रतापगडाचे मूळ स्वरूप जपतच संवर्धन केले गेले पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय सातारा तसेच पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या पाहणी दौऱ्याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ११ वाजता पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रतापगडावर सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. त्यानंतर त्यांनी भवानी माता मंदिरात दर्शन घेऊन आरती केली. पुढे मंदिराच्या सभागृहात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रतापगडावरील सुरू असलेल्या कामांची माहिती तसेच पूर्वीची स्थिती याविषयी सादरीकरण केले. यावेळी संवर्धनाच्या कामांची गती, दर्जा, तांत्रिक बाबी आणि भविष्यातील नियोजन यावर चर्चा करण्यात आली. काही ठिकाणी बांधकामाला योग्य पद्धतीने पाणी मारले जात नसल्याच्या तक्रारी उपस्थित झाल्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी संबंधित ठेकेदारांना फटकारले. “प्रतापगडावर पाण्याची उपलब्धता कमी असली तरी आवश्यक असल्यास टँकरच्या माध्यमातून पाणी आणून काम दर्जेदार केले पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
संवर्धनाच्या कामावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष असल्याचे सांगत, “या कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा इशाराही पालकमंत्री देसाई यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्रतापगडाचे ऐतिहासिक स्वरूप जतन करणे हीच खरी संवर्धनाची दिशा असल्याचे सांगत त्यांनी किल्ल्यावरील झाडेझुडपे हटवून संवर्धनाचे काम अधिक प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अधिकाधिक वृक्षलागवड करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागांना दिले. प्रतापगड संवर्धनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या बैठकीत पर्यटन सुविधा, ऐतिहासिक वास्तू संवर्धन, रस्ते, सार्वजनिक बांधकामे, वनविभागाशी संबंधित बाबी, पर्यटनवाढीसाठीच्या उपाययोजना तसेच स्थानिक नागरिकांच्या विविध मागण्यांचाही आढावा घेण्यात आला. विकासकामे करताना प्रतापगडाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अबाधित राखण्यावर भर देण्यात आला.
बैठकीस संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, प्रांताधिकारी योगेश खरमाटे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, विजय नायडू, जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, गटविकास अधिकारी विजय विभुते ,स्थानिक नागरिक आणि प्रतापगड परिसरातील प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्याच्या पर्यटन आणि ऐतिहासिक वारशाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रतापगडावरील सुरू असलेल्या कामांकडे प्रशासन, इतिहासप्रेमी, पर्यटन व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर संवर्धनाच्या कामांना अधिक गती मिळून प्रतापगडाचा ऐतिहासिक वैभव अधिक प्रभावीपणे जपले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment