पाचगणी नाक्यावर पर्यटकांची ‘जबरदस्ती टोलवसुली’? वायरल व्हिडिओनंतर संताप; “महाबळेश्वर प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे”
पाचगणी नाक्यावर पर्यटकांची ‘जबरदस्ती टोलवसुली’? वायरल व्हिडिओनंतर संताप; “महाबळेश्वर प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे”
महाबळेश्वर | प्रतिनिधी
पाचगणी मार्गे महाबळेश्वरकडे येणाऱ्या पर्यटकांकडून पाचगणी नाक्यावर जबरदस्तीने टोल वसूल केला जात असल्याचा गंभीर आरोप पुन्हा एकदा समोर आला असून, एका पर्यटकाने सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या संतापानंतर हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. संबंधित पर्यटकाने केलेला व्हिडिओ आणि प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून, “पर्यटकांची उघड लूट सुरू आहे, मात्र प्रशासन मात्र गप्प आहे,” अशी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
वायरल प्रतिक्रियेमध्ये संबंधित पर्यटकाने म्हटले आहे की, पाचगणी नाक्यावर वाहन अडवून जबरदस्तीने टोल आकारला जातो. अनेकदा पर्यटकांना योग्य माहिती दिली जात नाही, पावतीबाबतही संभ्रम निर्माण होतो आणि काही वेळा वादाचे प्रसंगदेखील घडतात. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत वारंवार तक्रारी होऊनही संबंधित यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महाबळेश्वर हे राज्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ मानले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. पर्यटनावरच स्थानिक अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून असताना, अशा प्रकारच्या कथित जबरदस्तीच्या वसुलीमुळे पर्यटकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे दिसून येत आहे. “महाबळेश्वरला येण्यापूर्वीच पर्यटकांचा अनुभव खराब होत असेल, तर याचा थेट परिणाम पर्यटन प्रतिमेवर होऊ शकतो,” अशी प्रतिक्रिया काही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, महाबळेश्वर नगरपरिषदेचे नागराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रत्यक्ष चौकशी करावी, तसेच पर्यटकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गेली अनेक वर्षे हा प्रकार सुरू असल्याचा आरोप होत असताना, प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे पर्यटकांसह स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment