कै. अमित सकपाळ यांच्या स्मरणार्थ वेळापूरमध्ये सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम; २०० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्री वाटप
कै. अमित सकपाळ यांच्या स्मरणार्थ वेळापूरमध्ये सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम; २०० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्री वाटप
✍️संतोष मालुसरे,
तापोळा | प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील वेळापूर येथे ‘स्मिती सोशल वर्क फाउंडेशन’ (SSF) यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. कै. अमित भगवान सकपाळ यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य व छत्री वाटप कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दि. १२ मे २०२६ रोजी श्री उत्तेश्वर पदमावती मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमांतर्गत परिसरातील तब्बल १८ शाळांमधील २०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांना वह्या, पेन-पेन्सिल, चित्रकला वह्या, रंगसाहित्य, टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल, टी-शर्ट्स, खेळणी तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्यांचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमासाठी श्री उत्तेश्वर पदमावती विकास मंडळ तसेच श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट यांनी विशेष पुढाकार घेत नियोजनबद्ध आयोजन केले होते. सामाजिक जाणीव जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
कार्यक्रमाला वेळापूर ग्रामपंचायतीचे सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान स्मिती सोशल वर्क फाउंडेशनच्या संचालिका रश्मी पी. महाजन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व आयोजकांचे आणि ग्रामस्थांचे त्यांनी विशेष आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षणात प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन पुढेही सुरू ठेवण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला. वितरित करण्यात आलेल्या साहित्याचा योग्य वापर करून विद्यार्थी प्रगती करतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.
Comments
Post a Comment