लग्नाचे आमिष, अपहरण अन् अत्याचार; पाचगणी पोलिसांनी २४ तासांत आरोपीला ठोकल्या बेड्याअल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका; आरोपी विभास सुतार पोलीस कोठडीत, जिल्हा पोलीस प्रमुखांकडून पथकाचे विशेष कौतुक
लग्नाचे आमिष, अपहरण अन् अत्याचार; पाचगणी पोलिसांनी २४ तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या
अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका; आरोपी विभास सुतार पोलीस कोठडीत, जिल्हा पोलीस प्रमुखांकडून पथकाचे विशेष कौतुक
पाचगणी | प्रतिनिधी
पाचगणी शहरातील शाहूनगर परिसरात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पाचगणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक करत धडक कारवाई केली आहे. विभास बाजीराव सुतार (वय २०, रा. वाळणे, पो. अहिर, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी पीडित मुलीची सुखरूप सुटका करून तिला पालकांच्या स्वाधीन केले असून, या तत्पर कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहूनगर येथील १६ वर्षे ७ महिने वयाच्या एका अल्पवयीन मुलीला आरोपी विभास सुतार याने लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले होते. दि. २१ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांकडे शोध घेतला; मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर मुलीच्या वडिलांनी दि. १४ मे २०२६ रोजी पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी तातडीने तपास सुरू करण्याचे आदेश दिले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने आणि पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान आरोपी विभास सुतार हा पीडित मुलीला घेऊन महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे येथील आपल्या राहत्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीच्या घरावर छापा टाकून पीडित मुलीची सुखरूप सुटका केली आणि आरोपीला ताब्यात घेतले. तपासात आरोपीला मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण माहिती असूनही त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध आणि संमतीशिवाय तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आली.
दि. १५ मे २०२६ रोजी पीडित मुलीने आपल्या पालकांच्या उपस्थितीत पोलिसांसमोर सविस्तर जबाब नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) तसेच इतर संबंधित गंभीर कलमान्वये गुन्ह्याची वाढ करून त्याला अधिकृतपणे अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पाचगणी पोलीस करत आहेत.
दरम्यान, अत्यंत संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावून आरोपीला जेरबंद केल्याबद्दल सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पाचगणी पोलिसांच्या संपूर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि जबाबदारीची भावना कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व सामाजिक स्तरातून व्यक्त होत आहेत.
Comments
Post a Comment