शिवकालीन वारशाकडे दुर्लक्ष; प्रतापगडाच्या पायथ्याशी पार गावातील ऐतिहासिक पुलाला सुरक्षेची गरज

शिवकालीन वारशाकडे दुर्लक्ष; प्रतापगडाच्या पायथ्याशी पार गावातील ऐतिहासिक पुलाला सुरक्षेची गरज

प्रतापगड प्रतिनिधी :

महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार गावातील शिवकालीन ऐतिहासिक पूल सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धोक्याच्या छायेत आला असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोयना विभागाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर असलेला हा पूल आजही मोठ्या प्रमाणावर वापरला जात असून दररोज नागरिक, पर्यटक आणि वाहनांची सतत वर्दळ येथे सुरू असते. मात्र पुलावर कोणत्याही प्रकारचे सुरक्षा रेलिंग उपलब्ध नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

विशेष म्हणजे पार गावाकडून पुलाकडे येणाऱ्या मार्गावर तीव्र उतार असून त्या ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षणात्मक रेलिंग नसल्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

इतिहासाच्या दृष्टीनेही हा पूल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड बांधण्यापूर्वी या पुलाची निर्मिती केल्याचे ऐतिहासिक दाखले उपलब्ध असल्याचे जाणकार सांगतात. शिवकालीन स्थापत्यकलेचा वारसा जपणारा हा पूल आजही भक्कमपणे उभा असला तरी त्याच्या देखभालीअभावी त्याचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा या समस्येकडे लक्ष वेधले असून पुलावर तातडीने सुरक्षा रेलिंग बसवावे, रस्त्याची दुरुस्ती करावी आणि ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाच्या असलेल्या या भागातील ऐतिहासिक वास्तूकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत तर भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यावरच यंत्रणा जागी होईल का, असा सवाल आता स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl