आंबेनळी घाट दुर्घटनेने राज्य हादरले; मृतांच्या कुटुंबियांना तातडीची मदत द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रशासनाला निर्देश

आंबेनळी घाट दुर्घटनेने राज्य हादरले; मृतांच्या कुटुंबियांना तातडीची मदत द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रशासनाला निर्देश

प्रतापगड प्रतिनिधी : 

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर–महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्याला हादरा बसला आहे. स्कॉर्पिओ वाहन सुमारे ८०० फूट खोल दरीत कोसळल्याने आठ युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या हृदयद्रावक घटनेबद्दल सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी सातारा आणि रायगड जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री देसाई यांनी तत्काळ सातारा व रायगड जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. बचावकार्याची गती वाढविणे, मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे तसेच पीडित कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत पोहोचविण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर अंधार आणि कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही बचाव पथकांनी तातडीने मोहीम सुरू केली. रायगड आणि सातारा जिल्हा पोलीस दल, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीम, महाड व पोलादपूर येथील ट्रेकर्स संघटना तसेच स्थानिक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता खोल दरीत उतरून शोध व बचावकार्य राबविले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अपघातग्रस्तांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या प्रक्रियेसंदर्भातील सर्व प्रशासकीय सोपस्कार जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

अपघातग्रस्त स्कॉर्पिओ वाहनाचा क्रमांक MH 11 DN 2340 असा असून त्यामध्ये एकूण आठ जण प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार आंबेनळी घाटातील एका तीव्र वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट खोल दरीत कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील चार, मर्ढे येथील दोन, खटाव तालुक्यातील एक तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

घटनेनंतर दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक सातत्याने संपर्कात असून संपूर्ण परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या दुर्दैवी दुर्घटनेतील सर्व मृत युवकांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात शासन आणि समाज सहभागी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

आंबेनळी घाटातील ही दुर्घटना राज्यातील अलीकडच्या काळातील सर्वांत भीषण अपघातांपैकी एक मानली जात असून, घाट रस्त्यांवरील सुरक्षाव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू असून पुढील तपासानंतर अपघाताची नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl