खांबील-चोरगे येथे स्वयंभू ईश्वरेश्वर गणेश मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची भव्य तयारी; दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
खांबील-चोरगे येथे स्वयंभू ईश्वरेश्वर गणेश मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची भव्य तयारी; दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
तापोळा प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील खांबील-चोरगे येथे स्वयंभू ईश्वरेश्वर गणेश मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, गुरुवार दि. ७ मे ते शुक्रवार दि. ८ मे २०२६ या कालावधीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता पालखीचे गावातून श्री क्षेत्र महाबळेश्वरकडे प्रस्थान होणार असून, त्यानंतर सकाळी १० वाजता श्री महादेवाच्या त्रिशूल, नाग आणि मूर्तीचे पूजन व अभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता श्री क्षेत्र महाबळेश्वर ते खांबील-चोरगे दरम्यान भव्य-दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी ३ ते ४ वाजता भोजन समारंभ आयोजित करण्यात आला असून, सायंकाळी ५ ते ६ वाजता मूर्ती धान्यवास विधी पार पडणार आहे. सायंकाळी ६ ते ७ वाजता हरिपाठाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. अतुल महाराज देशमुख यांचे कीर्तन होणार असून, रात्री ९ ते १० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १० नंतर श्री नवलाई प्रासादिक भजन मंडळ, आहिर (मुंबई) यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि. ८ मे रोजी सकाळी ७ ते ९ वाजता नवग्रह शांती विधी होणार असून, सकाळी ९ ते १२ या वेळेत विविध धार्मिक विधींचा समावेश असलेले पंचामृत स्नान, सर्वौषधी स्नान, मंगल स्नान, ब्रह्मशिला व कुर्मशिला पूजन, सदगुरू पूजन तसेच यज्ञमंडपातील हवन विधी पार पडणार आहेत. दुपारी १२ ते १ या वेळेत मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा होणार असून, त्यानंतर यज्ञमंडपात पूर्णाहुती, नैवेद्य व महाआरतीने सोहळ्याची सांगता केली जाईल. दुपारी २ ते ३ वाजता महाप्रसाद तर दुपारी ३ ते ५ वाजता मान्यवरांचे स्वागत-सत्कार व गावातील माहेरवाशिणींचा सन्मान आणि हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याचे मंगलविधी वेदमूर्ती महेश गो. पाठक गुरुजी यांच्या हस्ते पार पडणार असून, कलशारोहण ब्रह्मचारी चंद्रकांत बाबुराव शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून, खासदार नितीन पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच माजी आमदार दगडू संकपाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले असून, सर्व भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment