आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा सतर्क; मान्सूनपूर्व तयारीसह पाणी टंचाईवर विशेष भर
आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा सतर्क; मान्सूनपूर्व तयारीसह पाणी टंचाईवर विशेष भर
सातारा प्रतिनिधी —
आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत त्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर देत, यंदा हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे पाणी टंचाईचाही आराखडा समांतर तयार करण्याची गरज अधोरेखित केली.
या बैठकीत प्रत्येक विभागाने २० मे २०२६ पर्यंत आपला अद्यावत आपत्ती व्यवस्थापन आराखडा सादर करावा, तसेच तालुका आणि गावपातळीवर १५ मेपूर्वी पूर्वतयारी बैठका घेऊन स्थानिक स्तरावर सज्जता वाढवावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, तसेच सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाच्या सज्जतेचा भाग म्हणून प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नियुक्त करून १ जूनपासून २४x७ नियंत्रण कक्ष सुरू करावा, तसेच शोध व बचाव साहित्याची चाचणी २५ मेपूर्वी पूर्ण करावी, असे आदेश देण्यात आले. कोणतीही आपत्तीजन्य घटना घडल्यास तात्काळ जिल्हा व पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महसूल विभागाला धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, पूरग्रस्तांना अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, तसेच नालेसफाई आणि पूल दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. घाट रस्त्यांवरील संभाव्य दरडींचा धोका लक्षात घेता नोडल अधिकारी नेमून त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले असून, दरड कोसळल्यास त्वरित मार्ग मोकळा करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर देण्यात आला.
आरोग्य विभागाला साथरोग नियंत्रणासाठी औषधसाठा उपलब्ध ठेवणे, पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक उपाययोजना करणे, तसेच रुग्णालये आणि अॅम्ब्युलन्स सेवा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाटबंधारे विभागाने धरणनिहाय आपत्कालीन आराखडे तयार करून पाणीसाठा व विसर्गाचे योग्य नियोजन करावे आणि पाणी सोडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना वेळेवर सूचना द्याव्यात, असे निर्देशही देण्यात आले.
याशिवाय विद्युत वितरण विभागाला अतिवृष्टीदरम्यान संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने वीजपुरवठा खंडित करण्याची तयारी ठेवण्यास सांगण्यात आले असून, झाडांच्या फांद्या छाटणी आणि यंत्रसामग्रीची देखभाल पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पुरवठा विभागाने दुर्गम भागात अन्नधान्य व गॅसचा साठा ठेवावा, शिक्षण विभागाने शाळा स्थलांतरासाठी सज्ज ठेवाव्यात, तर पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या लसीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करावे, असेही निर्देश देण्यात आले.
पुनर्वसनासाठीच्या स्थलांतर शेडची स्वच्छता आणि दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी, तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या शेडची कामे गतीने मार्गी लावावीत, असे सांगण्यात आले. संभाव्य पूरस्थिती, दरडी कोसळणे, अतिवृष्टी आणि पाणी टंचाई या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून प्रशासनाने सर्वंकष तयारी ठेवावी, असे स्पष्ट करत जिल्हाधिकारी पाटील यांनी मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यावर भर दिला.
Comments
Post a Comment