चव, कौशल्य आणि उद्योजकतेचा संगम’; कुंभरोशी जिल्हा परिषद शाळेतील फूड फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद
‘चव, कौशल्य आणि उद्योजकतेचा संगम’; कुंभरोशी जिल्हा परिषद शाळेतील फूड फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘फूड फेस्टिवल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान, उद्योजकता, आर्थिक व्यवहारांची समज आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला होता. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या विक्रीतून तब्बल साडेपाच हजार रुपयांची उलाढाल करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
फूड फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध गटांनी गुलाबजामुन, भेटळ, सरबत, वडापाव यांसारखे चविष्ट पदार्थ तयार करून आकर्षक पद्धतीने स्टॉल उभारले होते. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांनी ग्राहकांना नम्रपणे माहिती देत विक्री केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ खाद्यपदार्थ तयार करण्याचे कौशल्यच नव्हे, तर नियोजन, व्यवहारकौशल्य, संवादकला आणि संघभावनेचाही अनुभव घेतला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि आत्मविश्वास कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सौ. कांचन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास मोरे, शिक्षण तज्ज्ञ पांडुरंग कारंडे गुरुजी, ग्रामस्थ तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची भावना विकसित होते, असे मत व्यक्त केले.
या उपक्रमाची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय सोंडकर यांची होती. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळावी या हेतूने हा उपक्रम राबविला. उपशिक्षिका श्रीम. रुपाली चव्हाण आणि श्रीम. वर्षा बुचडे यांनी विद्यार्थ्यांना पदार्थ तयार करण्यापासून स्टॉल व्यवस्थापनापर्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
शालेय जीवनात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आर्थिक नियोजन, जबाबदारीची जाणीव आणि सर्जनशीलता विकसित होण्यास मदत होते. त्यामुळे कुंभरोशी जिल्हा परिषद शाळेचा हा उपक्रम परिसरात विशेष कौतुकाचा विषय ठरला आहे.
Comments
Post a Comment