कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ‘गोमाते’ची उपासमार; महाबळेश्वरातील डम्पिंग ग्राऊंडवरील धक्कादायक वास्तवाने संताप उसळला


कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ‘गोमाते’ची उपासमार; महाबळेश्वरातील डम्पिंग ग्राऊंडवरील धक्कादायक वास्तवाने संताप उसळला

✍️मिलिंद काळे,

महाबळेश्वर प्रतिनिधी:

 जागतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर शहरात अत्यंत वेदनादायक आणि संतापजनक चित्र समोर आले असून, शहरातील डम्पिंग ग्राऊंडवर गायी प्लास्टिक आणि विषारी कचरा खात असल्याचे वास्तव उघड झाल्यानंतर नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आक्रमक झाली असून नगरपालिकेच्या निष्काळजी कारभारावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

भारतीय संस्कृतीत पूजनीय मानल्या जाणाऱ्या गोमातेला अन्नाअभावी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अन्न शोधावे लागत असल्याचे चित्र पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. डम्पिंग ग्राऊंड परिसरात भटक्या जनावरांचा मुक्त संचार असून त्या प्लास्टिक, कुजलेले अन्न व इतर घातक पदार्थ खात असल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यावरण आणि पशुसंवर्धनाच्या दृष्टीनेही ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या गंभीर प्रकाराकडे सर्वप्रथम लक्ष वेधले ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उद्योजक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिथुन भानुदास तळवलकर यांनी. त्यांनी डम्पिंग ग्राऊंडवरील परिस्थितीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला. या व्हिडिओमध्ये गायी कचऱ्यातील प्लास्टिक आणि अन्नाचे अवशेष खाताना दिसत असल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

शनिवारी दुपारी करण्यात आलेल्या पाहणीत अनेक गायी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात भटकताना आढळल्या. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली असून हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने पक्षाच्या शिष्टमंडळाने नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. शिंदे तसेच स्वच्छता सभापती यांची भेट घेत निवेदन सादर केले. या निवेदनात डम्पिंग ग्राऊंडला तात्काळ संरक्षक कुंपण घालण्यात यावे, भटक्या गाईंसाठी स्वतंत्र गोशाळा उभारण्यात यावी तसेच शहरात वैज्ञानिक पद्धतीने कचरा व्यवस्थापन प्रणाली राबविण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

दरम्यान, प्रशासनाने सात दिवसांच्या आत ठोस उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आरपीआय (A) तालुकाध्यक्ष जॉन जोसेफ यांनी दिला आहे. या वेळी कार्याध्यक्ष पप्पू भोसले, शहराध्यक्ष विनायक गायकवाड, ऋषिकेश वायदंडे, चंद्रकांत इम्मन, शैलेश घाडगे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महाबळेश्वरसारख्या पर्यटननगरीत अशा प्रकारे जनावरांना कचऱ्यात अन्न शोधण्याची वेळ येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl