हक्काच्या जागेसाठी लढा की दहशतीचे सावट?; डोईफोडे कुटुंबाचा गुंडगिरी, धमक्या आणि पोलिसांच्या निष्क्रियतेवर गंभीर आरोप
सामाईक जागेच्या वादातून वाढला संघर्ष; मारहाण, खोट्या तक्रारी आणि जीविताला धोका असल्याचा दावा
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर शहरातील देवी चौक परिसरात सामाईक जागेच्या वादातून एका कुटुंबाला गेल्या अनेक महिन्यांपासून मानसिक छळ, धमक्या, मारहाण आणि खोट्या तक्रारींचा सामना करावा लागत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पल्लवी जनार्दन डोईफोडे आणि त्यांच्या १५ सदस्यीय कुटुंबाने या प्रकरणी स्थानिक पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, वारंवार तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने संपूर्ण कुटुंब भीतीच्या वातावरणात जीवन जगत असल्याचा दावा केला आहे.
माहितीनुसार, देवी चौक परिसरातील सुमारे १३ गुंठे सामाईक जागेवरून हा वाद निर्माण झाला आहे. संबंधित जागेमध्ये पल्लवी डोईफोडे यांच्या कुटुंबाचा सुमारे सव्वा चार गुंठे हिस्सा असून, त्याच जागेत शंकर बाबुराव डोईफोडे आणि त्यांच्या सावत्र आई नाकाबाई डोईफोडे यांचाही हिस्सा आहे. मात्र पल्लवी डोईफोडे यांचा आरोप आहे की, शंकर डोईफोडे यांनी स्वतःच्या हिस्स्यातील मोठा भाग यापूर्वीच विकला असतानाही ते त्यांच्या हक्काच्या जागेवर दावा सांगत असून जागेचा वापर आणि बांधकाम करण्यास सातत्याने अडथळे निर्माण करत आहेत.
मे २०२३ मध्ये कुटुंबातील कर्ते पुरुष जनार्दन डोईफोडे यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी स्वतःच्या हक्काच्या जागेत नवीन घर बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीपासूनच या निर्णयाला विरोध करण्यात आल्याचा आरोप आहे. "फक्त १० बाय १० ची खोली बांधा, त्यापेक्षा जास्त जागेची मागणी करू नका," असा दबाव सातत्याने टाकण्यात आल्याचे पल्लवी डोईफोडे यांनी सांगितले.
मे २०२५ मध्ये जुने बांधकाम पाडून नवीन घर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी विरोधी गटातील काही व्यक्तींनी बांधकामस्थळी जाऊन कामगारांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी कामगारांनी काम बंद केले आणि जवळपास सहा महिने बांधकाम रखडल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये पुन्हा बांधकाम सुरू झाल्यानंतर परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनल्याचे सांगितले जाते. पल्लवी डोईफोडे यांचे भाऊ सुमित यांना रात्रीच्या वेळी गटारात ढकलून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर संबंधितांवर कारवाई होण्याऐवजी उलट खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही त्रास थांबला नसून, पोलीस उपस्थित असतानाही त्यांच्या धाकट्या भावाविरोधात दखलपात्र नसलेली तक्रार (एनसी) दाखल करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
याशिवाय घरावर वारंवार खरकटे आणि घाणेरडे पाणी फेकणे, हक्काच्या जागेत जबरदस्तीने चूल पेटवणे, घराभोवती त्रासदायक वातावरण निर्माण करणे तसेच "घर जाळून टाकू" आणि "जीवे मारू" अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात येत असल्याचे गंभीर आरोपही कुटुंबीयांनी केले आहेत. या घटनांमुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसह संपूर्ण कुटुंब सतत भीतीच्या छायेखाली राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
पीडित कुटुंबाच्या मते, गेल्या अनेक महिन्यांमध्ये विविध स्वरूपाच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल करण्यात आल्या. मात्र बहुतांश प्रकरणांमध्ये केवळ दखलपात्र नसलेल्या नोंदी करून विषय संपविण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींमध्ये कायद्याची भीती उरली नसून त्यांच्या वर्तनाला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळत असल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, धमक्या आणि मारहाणीच्या आरोपांची सखोल तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच कुटुंबाच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेची हमी प्रशासनाने द्यावी, अशी मागणी पल्लवी डोईफोडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. सामाईक जागेच्या वादातून निर्माण झालेला हा संघर्ष आता केवळ मालमत्तेच्या प्रश्नापुरता मर्यादित न राहता कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर विषय बनल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
दरम्यान, या वृत्तात नमूद करण्यात आलेले सर्व आरोप संबंधित कुटुंबीयांनी केलेले असून त्याबाबत संबंधित पक्षाची भूमिका वृत्त लिहिपर्यंत प्राप्त होऊ शकली नव्हती. संबंधितांचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर तेही प्रसिद्ध करण्यात येईल.
Comments
Post a Comment