वेण्णा लेक कमानी पुलाचे काम ठप्प; नदीपात्र धोक्यात, नागरिकांमध्ये संताप खोदकामातील मातीचे ढिगारे वेण्णा नदीत; पावसाळ्यापूर्वी हटवण्याची जोरदार मागणी
वेण्णा लेक कमानी पुलाचे काम ठप्प; नदीपात्र धोक्यात, नागरिकांमध्ये संताप
खोदकामातील मातीचे ढिगारे वेण्णा नदीत; पावसाळ्यापूर्वी हटवण्याची जोरदार मागणी
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वरच्या पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या वेण्णा लेक परिसरात पर्यायी रस्त्यासाठी उभारण्यात येत असलेल्या कमानी पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि शहरातील पर्यटन व्यवस्थापन अधिक सुलभ करण्यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या निधीतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला होता. जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात पुलाचे काम अर्धवट अवस्थेतच थांबल्याने प्रकल्प पुन्हा रखडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वेण्णा लेक परिसरातील कमानी पुलाच्या बांधकामासाठी करण्यात आलेल्या खोदकामातून निघालेली शेकडो टन माती सध्या थेट वेण्णा नदीपात्रात साठवून ठेवण्यात आली आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ही माती अद्याप हटवण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. जोरदार पावसामुळे ही माती नदीत वाहून गेल्यास मोठ्या प्रमाणात गाळ साचण्याचा धोका असून त्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेण्णा नदीच्या परिसरातील शेती, विहिरी आणि जलस्रोतांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुलाचे काम थांबण्यामागे विविध कारणांची चर्चा सुरू आहे. काहींच्या मते निधीअभावी ठेकेदाराने काम बंद केले आहे, तर अधिकाऱ्यांकडून वेगळे कारण सांगितले जात आहे. पुलाच्या कामावर कार्यरत असलेले बहुतांश मजूर पश्चिम बंगालमधील असून तेथील निवडणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी ते आपल्या गावी गेल्यामुळे काम काही काळासाठी थांबले असल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात येत आहे. मात्र स्थानिक नागरिकांना हे कारण फारसे पटत नसून प्रशासनाने या कामाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
महाबळेश्वर-पाचगणी मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वेण्णा लेकला वळसा घालणारा हा पर्यायी रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पर्यटन हंगामात वेण्णा लेक आणि मॅप्रो गार्डन परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे हा बायपास रस्ता आणि कमानी पूल पूर्ण झाल्यास वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार होता. या प्रकल्पांतर्गत सुमारे १,७५० मीटर लांबीचा रस्ता, एक छोटा पूल आणि वेण्णा लेकच्या सांडव्याखाली कमानी पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. अप्सरा हॉटेलमार्गे पर्यायी वाहतूक शहरात वळवण्याची योजना असून त्यासाठी शासनाने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
वन विभागाच्या परवानग्या, वेण्णा धरणाच्या उंचीशी संबंधित तांत्रिक मुद्दे आणि इतर प्रशासकीय अडचणींमुळे हे काम अनेक वर्षे रखडले होते. अखेर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर या कामाला गती मिळाली होती. सुरुवातीच्या टप्प्यात पुलासाठी खोदकाम करून मोठे खांबही उभारण्यात आले. मात्र त्यानंतर अचानक काम बंद पडल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. काही ठिकाणी बांधकाम साहित्य तसेच मातीचे ढिगारे अस्ताव्यस्त पडून असल्याने परिसराच्या सौंदर्यावरही परिणाम होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
नदीपात्रात साचलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ विशेषतः संतप्त झाले आहेत. या मातीमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले असून पावसाळ्यापूर्वी ती हटवली नाही, तर आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, गेल्या काही वर्षांत वेण्णा नदीतील पाण्याचा प्रवाह आधीच कमी झाला असून गाळ साचल्याने शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. आता पुलाच्या कामातून टाकण्यात आलेली अतिरिक्त माती नदीत गेल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
“नदी वाचली तरच शेती वाचेल” — स्थानिक शेतकऱ्यांची भावना
“वेण्णा नदी ही आमच्यासाठी फक्त पाण्याचा स्रोत नाही, तर आमच्या शेतीचा आणि जगण्याचा आधार आहे. प्रशासनाने विकासकामे करावीत, त्याला आमचा विरोध नाही. पण विकासाच्या नावाखाली नदीच गाडली जात असेल तर ते आम्हाला मान्य नाही. पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील माती हटवली नाही, तर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसेल. आधी नदी वाचवा, मग तांत्रिक कामे करा,” अशी भावना स्थानिक शेतकरी शरद बावळेकर यांनी व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी लघु पाटबंधारे विभागाने वेण्णा नदीच्या पूर नियंत्रण रेषा निश्चित करण्याचे काम सुरू केले होते. मात्र नदीपात्रात आधीच वाढलेल्या गाळामुळे आणि पुलाच्या कामातून टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रक्रियेलाही विरोध दर्शवला आहे. नागरिकांनी यासंदर्भात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन वेण्णा नदीतील गाळ काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित मुख्याधिकाऱ्यांना नदीपात्रातील गाळ हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही.
वेण्णा नदीच्या पर्यावरणीय अस्तित्वाचा प्रश्न आणि रखडलेल्या कमानी पुलाचे काम यामुळे प्रशासनासमोर दुहेरी आव्हान उभे ठाकले आहे. एकीकडे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा प्रकल्प रखडला आहे, तर दुसरीकडे नदीपात्रातील मातीमुळे पर्यावरणीय संकट निर्माण होण्याची भीती वाढत आहे. पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील माती हटवून पुलाच्या कामाला गती देण्यात आली नाही, तर नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागू शकते.
Comments
Post a Comment