बावलीत भक्तीचा महासोहळा; नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व सभामंडपाचे लोकार्पण बावली रस्ता महाबळेश्वर मार्गाला जोडण्याचे दिले अभिवचन;
बावलीत भक्तीचा महासोहळा; नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व सभामंडपाचे लोकार्पण
बावली रस्ता महाबळेश्वर मार्गाला जोडण्याचे दिले अभिवचन; शिवशाहीर दिलीप सावंत यांच्या शाहिरीने वातावरण झाले शिवमय
✍️प्रकाश कदम
पोलादपूर प्रतिनिधी :
बावली (रानकडसरी) गावातील नव्याने उभारण्यात आलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व भव्य सभामंडपाच्या लोकार्पण सोहळ्याला भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक वैभवाची अनोखी जोड लाभली. राज्याचे नामदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. दि. ७ ते ९ मेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
मंदिर परिसर आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट आणि भगव्या पताकांनी सजविण्यात आला होता. “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”च्या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. पारंपरिक पूजा, मंत्रोच्चार, हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन तसेच विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. गावातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले होते.
लोकार्पण सोहळ्यात बोलताना नामदार भरतशेठ गोगावले म्हणाले, “मंदिर हे समाजाला एकत्र आणणारे श्रद्धास्थान असून धार्मिक व सामाजिक विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.” यावेळी त्यांनी भविष्यात बावली (रानकडसरी) येथील रस्ता पोलादपूर-महाबळेश्वर मार्गाला जोडण्यात येईल, असे महत्त्वपूर्ण अभिवचन दिले. या घोषणेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
नव्याने उभारण्यात आलेला भव्य सभामंडप गावातील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरणार असून ग्रामस्थांना आता विविध कार्यक्रमांसाठी सुसज्ज जागा उपलब्ध झाली आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
दि. ७ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात कोल्हापूर येथील प्रसिद्ध शिवशाहीर दिलीप सावंत यांनी सादर केलेल्या शिवचरित्रावरील शाहिरी कार्यक्रमाने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यांच्या ओजस्वी सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास ऐकताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या सोहळ्यास सदगुरु दादा महाराज मोरे माऊली, जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुभाष पवार, तालुका प्रमुख निलेश आहिरे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, युवासेना प्रमुख विजय शेलार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कदम, प्रताप कुमठेकर, पंचायत समिती सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला वर्ग तसेच वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थ आणि सर्व तरुण सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण धार्मिक सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
Comments
Post a Comment