अवैध दारूचा कहर; पाटण तालुक्यात अल्पवयीनांकडून वाहतूक, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

अवैध दारूचा कहर; पाटण तालुक्यात अल्पवयीनांकडून वाहतूक, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

पाटण प्रतिनिधी —

 पाटण तालुक्यातील धामणी परिसरात अवैध दारू विक्रीचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस प्रशासनाकडे तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, धामणी येथील काही व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून गोवा राज्यातून बनावट बिअर, देशी दारू तसेच इतर मद्य मोठ्या प्रमाणावर आणून करपेवाडी, आरडे, बाबरवाडी, मस्करवाडी आणि राणेवाडी या गावांमध्ये अवैधरित्या विक्री करत आहेत. विशेष म्हणजे, या बेकायदेशीर धंद्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करून दुचाकीवरून दारूची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.

संबंधितांकडे कोणताही वैध परवाना नसताना खुलेआम दारू विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही बाब वारंवार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निदर्शनास आणून देऊनही ठोस कारवाई झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. मोठ्या आर्थिक व्यवहारांच्या आधारे हा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगू लागली आहे.

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष उत्तम यदुनाथ भालेराव यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करत सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी, अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, “जिल्ह्यात कोणताही अवैध व्यवसाय चालू देणार नाही. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल.”

या संपूर्ण प्रकारामुळे पाटण तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करून या अवैध धंद्याला आळा घालावा, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 प्रशासनाची ठाम भूमिका

“जिल्ह्यात कोणताही अवैध व्यवसाय चालू देणार नाही. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल.”
— जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl