‘बालहक्क आणि महिला सुरक्षा’ विषयावर विद्यार्थ्यांचे प्रबोधन; गिरिस्थान शाळेत मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात
‘बालहक्क आणि महिला सुरक्षा’ विषयावर विद्यार्थ्यांचे प्रबोधन; गिरिस्थान शाळेत मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर येथील गिरिस्थान नगरपरिषद मुलांची शाळा क्र. १ येथे महिला व बाल संरक्षण विषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना स्वतःच्या हक्कांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात संरक्षण अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत महिला व बाल संरक्षणाशी संबंधित विविध कायद्यांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा २००५, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम २०१३ (POSH Act) याविषयी मार्गदर्शन करत महिलांवरील शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि लैंगिक अत्याचारांचे प्रकार स्पष्ट केले. अशा घटनांमध्ये महिलांना उपलब्ध असलेले कायदेशीर संरक्षण, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया तसेच शासनामार्फत मिळणाऱ्या मदतीविषयीही त्यांनी माहिती दिली. कौटुंबिक हिंसाचाराचा महिलांसह मुलांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांवरही त्यांनी सखोल भाष्य केले.
यावेळी विद्यार्थ्यांना बाल न्याय कायदा २०१५, पॉक्सो कायदा २०१२, बालकामगार प्रतिबंध कायदा तसेच बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ यांची माहिती देण्यात आली. अल्पवयीन मुला-मुलींच्या संरक्षणासाठी शासनाने केलेल्या कठोर तरतुदी, बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठीचे उपाय, बालमजुरीमुळे होणारे शैक्षणिक व मानसिक नुकसान तसेच बालविवाहामुळे मुलांच्या आरोग्य, शिक्षण आणि भविष्यावर होणारे गंभीर परिणाम याविषयी उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध प्रश्न विचारले. उपस्थित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समर्पक निरसन करत त्यांना कायद्यांविषयी अधिक जागरूक केले. संशयास्पद घटना, अत्याचार किंवा बालसुरक्षेशी संबंधित बाबी निदर्शनास आल्यास तात्काळ १०९८ या चाइल्डलाईन टोल फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
तसेच बालसंगोपन योजनेंतर्गत एक पालक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या आर्थिक व शैक्षणिक मदतीची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांविषयी सजग राहून समाजातही जनजागृती करावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महिला व बाल संरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली जागरूकता ही समाजासाठी सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment