चर्मकार समाजासाठी सुवर्णसंधी; पुण्यात २४ मे रोजी भव्य वधू-वर परिचय मेळावा, मान्यवरांची राहणार उपस्थिती
चर्मकार समाजासाठी सुवर्णसंधी; पुण्यात २४ मे रोजी भव्य वधू-वर परिचय मेळावा, मान्यवरांची राहणार उपस्थिती
पुणे प्रतिनिधी :
समाजातील तरुण-तरुणींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'संत शिरोमणी रविदास विकास संस्था, महाराष्ट्र' यांच्या वतीने भव्य ‘चर्मकार समाज वधू-वर परिचय मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. संस्थेच्या ‘रेशीम बंध वधू-वर सूचक मंडळा’च्या माध्यमातून हा उपक्रम रविवारी दि. २४ मे २०२६ रोजी पुणे येथे संपन्न होणार असून, राज्यभरातील चर्मकार समाजातील युवक-युवती व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विवाह संस्था आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाच्या काळात समाजातील कुटुंबांना प्रत्यक्ष भेटीगाठी घडून याव्यात, विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि योग्य जोडीदार निवडण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच छताखाली समाजातील विविध भागांतील वधू-वर व त्यांच्या कुटुंबीयांना संवाद साधण्याची संधी या मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
हा मेळावा दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत वेदशास्त्रोत्तेजक सभागृह, २०४६ सदाशिव पेठ, सणस ग्राऊंड शेजारी, हॉटेल विश्व समोर, पुणे – ३० येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी समाजातील अनेक मान्यवर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. डी. एस. निर्मळे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त समाजसेवक दिनकर (तात्या) सोनवणे तसेच सेवानिवृत्त कस्टम अधिकारी पांडुरंग वैष्णव साहेब यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला अधिक वैचारिक आणि सामाजिक दिशा मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव नारायण सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून, समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींना सन्मानपूर्वक आणि विश्वासार्ह वातावरणात योग्य जोडीदार शोधण्यास मदत व्हावी हा यामागील मुख्य उद्देश आहे. समाजातील पारंपरिक मूल्ये जपत आधुनिक काळातील गरजांनुसार विवाह जुळवणीची प्रक्रिया अधिक परिणामकारक करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
मेळाव्यासाठी प्रवेश शुल्क नाममात्र ५०० रुपये ठेवण्यात आले असून, इच्छुकांनी आगाऊ नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी आयोजक व समिती सदस्यांशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
“सामाजिक बांधिलकी व समाजसेवा हेच आमचे ध्येय” हे ब्रीदवाक्य अंगीकारून कार्यरत असलेल्या संत शिरोमणी रविदास विकास संस्थेच्या या उपक्रमामुळे समाजातील अनेक कुटुंबांना एकमेकांशी जोडले जाण्याची आणि विवाहबंधनाची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. समाजातील युवक-युवती, पालक आणि समाजबांधवांनी या मेळाव्याचा लाभ घेऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment