डोंगरदऱ्यांतून थेट गुणवत्तेच्या शिखरावर; पार्वतीपूर पारच्या वरदा सोंडकरची सातार्यात दमदार कामगिरी
डोंगरदऱ्यांतून थेट गुणवत्तेच्या शिखरावर; पार्वतीपूर पारच्या वरदा सोंडकरची सातार्यात दमदार कामगिरी
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वरच्या डोंगरदऱ्यांत वसलेल्या पार्वतीपूर पार गावातील एका होतकरू विद्यार्थिनीने आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सातार्याच्या शैक्षणिक विश्वात उल्लेखनीय ठसा उमटवला आहे. कुमारी वरदा मंगेश सोंडकर हिने सातारा येथील नामांकित गुरुकुल शिक्षण संस्थेच्या गुरुकुल स्कूलमध्ये ९९ टक्के गुण मिळवत शाळेत द्वितीय क्रमांक पटकावला असून तिच्या या भव्य यशामुळे संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या शालेय परीक्षेत गुरुकुल स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून एकूण १२१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात वरदाने सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दुसरे स्थान मिळवले. ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील योग्य संधी आणि मेहनतीच्या बळावर कोणतीही उंची गाठू शकतात, हे तिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
वरदा सध्या सातारा शहरातील गुरुवार पेठ परिसरात वास्तव्यास असून तिचे वडील मंगेश मारुती सोंडकर हे कॉम्प्युटर क्लासचे संचालन करतात. आई सौ. सुजाता सोंडकर या गृहिणी आहेत. मुलीच्या शिक्षणासाठी दोघांनीही सातत्याने पाठबळ दिले. घरातील सकारात्मक वातावरण, अभ्यासासाठी मिळालेले स्वातंत्र्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हेच आपल्या यशाचे मुख्य कारण असल्याचे वरदाने सांगितले.
“यशासाठी नियमित अभ्यास आणि स्वतःवर विश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. आई-वडिलांनी नेहमी प्रोत्साहन दिले. शिक्षकांनी योग्य दिशा दाखवली. त्यामुळे हे यश मिळवता आले,” असे सांगताना वरदाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत होता.
विशेष म्हणजे, वरदाची स्वप्नेही मोठी आहेत. पुढे जाऊन सी.ए. किंवा डॉक्टर बनून समाजासाठी काम करण्याची तिची इच्छा आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे ध्येय तिने उराशी बाळगले आहे.
वरदाच्या या यशामुळे पार्वतीपूर पार गावात आनंदोत्सवाचे वातावरण असून ग्रामस्थांकडून तिचे कौतुक केले जात आहे. “गावच्या मुलीने संपूर्ण तालुक्याचे नाव उज्ज्वल केले,” अशा भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. तसेच मुंबईस्थित पार ग्रामस्थ मंडळाकडूनही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला असून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण मातीतून उगवलेली ही यशाची सुवर्णकथा अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि पालकांचे पाठबळ असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नसते, हे वरदा सोंडकर हिने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.
Comments
Post a Comment