वादळी दुर्घटनेतील मृत बोट चालकाच्या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांच्याकडून १ लाखांची मदत; अजित संकपाळ व गणेश उतेकर यांच्या पाठपुराव्याला यशशिवसागर जलाशयातील दुर्घटनेनंतर मदतीचा हात; रुपेश तांबे यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार
वादळी दुर्घटनेतील मृत बोट चालकाच्या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांच्याकडून १ लाखांची मदत; अजित संकपाळ व गणेश उतेकर यांच्या पाठपुराव्याला यश
शिवसागर जलाशयातील दुर्घटनेनंतर मदतीचा हात; रुपेश तांबे यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार
प्रतापगड | वार्ताहर :
तापोळा-बामनोली परिसरातील शिवसागर अर्थात छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात घडलेल्या भीषण स्पीड बोट दुर्घटनेत मृत्यू झालेल्या बोट चालक रुपेश तांबे यांच्या कुटुंबाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. या मदतीसाठी स्थानिक पातळीवर सातत्याने पाठपुरावा करणारे अजित संकपाळ आणि गणेश उतेकर यांच्या प्रयत्नांना यश आल्याने तांबे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
बुधवारी (दि. १३) सायंकाळी तापोळा-बामनोली परिसरात अचानक आलेल्या सुसाट वादळामुळे शिवसागर जलाशयात पर्यटकांना घेऊन फिरणारी स्पीड बोट पलटी झाली होती. या दुर्घटनेत मुंबईहून आलेले पर्यटक पती-पत्नी सुदैवाने बचावले, मात्र बोटीचा चालक रुपेश तांबे हे जलाशयात बेपत्ता झाले होते. गुरुवारी दुपारी व्यापक शोधमोहीमेदरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे संपूर्ण तापोळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी सोनाडी-सावरी पुलाजवळ अचानक हवामानात बदल झाला आणि काही क्षणांतच जलाशयात मोठ्या लाटा निर्माण झाल्या. बोट पलटी झाल्यानंतर पर्यटक दाम्पत्याने लाईफ जॅकेटच्या सहाय्याने स्वतःचा जीव वाचवला. मात्र रुपेश तांबे यांनी पोहत किनाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न केला असतानाच ते खोल पाण्यात बेपत्ता झाले. स्थानिक ग्रामस्थ, बोट चालक आणि प्रशासनाने रात्रभर शोधमोहीम राबवली होती.
गुरुवारी सकाळपासून शिवसागर बोट क्लबचे चेअरमन आनंद धनावडे, संचालक मंडळ, स्थानिक नागरिक आणि बोट चालक यांनी सुमारे १५ बोटींच्या सहाय्याने पुन्हा शोधकार्य सुरू केले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारी रुपेश तांबे यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली होती.
दरम्यान, रुपेश तांबे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी अजित संकपाळ आणि गणेश उतेकर यांनी तातडीने पाठपुरावा सुरू केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तांबे कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. या मदतीमुळे दुःखाच्या काळात कुटुंबाला काही प्रमाणात आधार मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
तापोळा-बामनोली परिसरातील जलपर्यटन व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र अचानक बदलणारे हवामान, जलाशयातील धोके आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे बोट चालकांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत असल्याची चर्चा या दुर्घटनेनंतर पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे जलपर्यटन क्षेत्रात अधिक सक्षम सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
Comments
Post a Comment