वादळी हवामानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे जुहू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग; वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
वादळी हवामानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे जुहू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग; वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
मुंबई प्रतिनिधी —
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला गुरुवारी दुपारी खराब हवामानाचा मोठा फटका बसल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबईतील महालक्ष्मी हेलिपॅडवरून सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे गावाकडे रवाना झालेल्या शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला कल्याण, ऐरोली आणि मुरबाड परिसरात अचानक निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यांचा, धुळीच्या लोटांचा आणि मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. मात्र वैमानिकाने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर सुरक्षितपणे जुहू एअरपोर्ट येथे उतरवले आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले होते. सुरुवातीला हवामान सामान्य असले तरी काही अंतर पार केल्यानंतर वातावरण अचानक बदलू लागले. कल्याण-मुरबाड परिसरात जोरदार वारे, धुळीचे वादळ आणि पावसाची तीव्रता वाढल्याने हेलिकॉप्टर काही काळ प्रतिकूल परिस्थितीत अडकून पडले. दृश्यमानता कमी होत असल्याचे लक्षात येताच वैमानिकाने तातडीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि पुढील प्रवास धोकादायक ठरू शकतो, असा निर्णय घेत हेलिकॉप्टर परत मुंबईकडे वळवले.
यानंतर हेलिकॉप्टरचे सुरक्षितपणे जुहू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या हेलिकॉप्टरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे खासगी सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी तसेच विमान कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
काही वृत्तांनुसार, हेलिकॉप्टर जवळपास २० ते २५ मिनिटे खराब हवामानात अडकले होते. या काळात हेलिकॉप्टरला जोरदार हवेचे प्रवाह आणि अस्थिर वातावरणाचा सामना करावा लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र वैमानिकाच्या अनुभवामुळे आणि तातडीच्या निर्णयक्षमतेमुळे मोठा अपघात टळल्याची चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, गुरुवारी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि परिसरात अचानक अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि धुळीचे लोट निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागांत वाहतुकीचा वेग मंदावला असून काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. खराब हवामानामुळे काही हवाई सेवांवरही परिणाम झाल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेनंतर राज्यातील बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर हवाई सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, वैमानिकाच्या सतर्कतेचे विविध स्तरांतून कौतुक केले जात आहे.
Comments
Post a Comment