महाबळेश्वरात ८ कोटींच्या रस्तेकामावर संशयाचा डाग; सॅम्पल नाही, पेवर मशीन नाही, अधिकारी जबाबदारीपासून दूर!“सत्ताधारी सत्तेच्या नशेत बेधुंद; शहरातील एकही काम पूर्ण होत नाही” – नगरसेवक कुमार शिंदे यांचा घणाघात
महाबळेश्वरात ८ कोटींच्या रस्तेकामावर संशयाचा डाग; सॅम्पल नाही, पेवर मशीन नाही, अधिकारी जबाबदारीपासून दूर!
“सत्ताधारी सत्तेच्या नशेत बेधुंद; शहरातील एकही काम पूर्ण होत नाही” – नगरसेवक कुमार शिंदे यांचा घणाघात
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचा विकासाचा गाजावाजा आता पूर्णपणे उघडा पडत असल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे. विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची कामे सुरू असली तरी प्रत्यक्षात अनेक कामांमध्ये निकृष्ट दर्जा, नियमभंग, निष्काळजीपणा आणि जबाबदारी टाळण्याचे प्रकार समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शहरातील हॉटेल आर.आर. ते लॉर्डविक पॉईंट या महत्त्वाच्या मार्गावरील तब्बल ८ कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्तेकामाने तर संपूर्ण प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. GVD एम्पर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे हे काम देण्यात आले असून एकूण १२०० मीटर लांबीच्या रस्त्यापैकी सुमारे ४०० मीटर काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्या आहेत.
सार्वजनिक बांधकामांमध्ये दर्जा तपासणीसाठी काँक्रीटचे सॅम्पल घेणे बंधनकारक असते. मात्र या महत्त्वाच्या रस्तेकामात सॅम्पलच घेतले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. पत्रकार आणि नागरिकांनी याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता “आज कामाला उशीर झाला म्हणून सॅम्पल घेतले नाहीत,” असे उत्तर देण्यात आले. कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक कामात असा निष्काळजीपणा होत असेल तर नागरिकांच्या पैशांचा नेमका वापर कसा केला जात आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
याचबरोबर या रस्तेकामासाठी पेवर मशीनचा वापर आवश्यक असतानाही प्रत्यक्षात मशीनचा वापरच होत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत विचारले असता संबंधित अधिकारी प्रदीप बोरगे यांनी “जागेअभावी पेवर मशीन उपलब्ध होत नाही,” असे स्पष्टीकरण दिले. मात्र नागरिकांनी या उत्तरावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून नियम मोडून कामे करण्याला प्रशासनाचे मूक समर्थन असल्याचा आरोप केला जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे नगरपालिकेच्या सिव्हिल इंजिनिअरशी संपर्क साधला असता त्यांनी “त्या कामाचा चार्ज माझ्याकडे नाही. मी तिथे येऊन काही उपयोग नाही,” असे सांगत जबाबदारी झटकली. त्यामुळे सिव्हिल कामाचा कारभार नेमका कोण पाहत आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे मेकॅनिकल अधिकाऱ्याकडे सिव्हिल कामाचा चार्ज देण्यात आल्याची चर्चा सुरू असून त्यामुळे प्रशासनातील समन्वय आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या संपूर्ण प्रकारावर विद्यमान नगरसेवक कुमार शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “महाबळेश्वरच्या जनतेने विकासासाठी सत्ता दिली; मात्र सत्ताधारी सत्तेच्या नशेत इतके बेधुंद झाले आहेत की शहरातील एकही काम वेळेत आणि दर्जेदार पूर्ण होत नाही. अधिकारी जबाबदारी झटकतात, नियम धाब्यावर बसवले जातात आणि सत्ताधारी गप्प बसतात. हा जनतेच्या विश्वासाचा घात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “या रस्त्याची गुणवत्ता तपासणी होईपर्यंत पुढील काम होऊ देणार नाही. अन्यथा जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू, काम बंद पाडू आणि संबंधितांना त्यांच्या निष्काळजीपणाची किंमत चुकवावी लागेल.”
महाबळेश्वरसारख्या जागतिक पर्यटनस्थळी विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. पर्यटननगरीची प्रतिमा धुळीस मिळवणाऱ्या या कामांबाबत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी तातडीने खुलासा करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा येत्या काळात नागरिकांचा जनआक्रोश रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे.
Comments
Post a Comment