आंबेनळी घाटात आठ बळी गेल्यानंतरही प्रशासन झोपेत?; तुटलेले कठडे, अपुरी सुरक्षा आणि संतप्त नागरिकांचे आंदोलनाचे संकेत

आंबेनळी घाटात आठ बळी गेल्यानंतरही प्रशासन झोपेत?; तुटलेले कठडे, अपुरी सुरक्षा आणि संतप्त नागरिकांचे आंदोलनाचे संकेत

प्रतापगड प्रतिनिधी :

महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण दुर्घटनेत आठ युवकांना आपला जीव गमवावा लागल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने नेमकी कोणती दखल घेतली, घाटातील सुरक्षेच्या त्रुटी दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना केली, असा प्रश्न आता सुजाण नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा तसेच महाबळेश्वरला येणाऱ्या लाखो पर्यटकांचा मुख्य मार्ग असलेला आंबेनळी घाट आजही अनेक गंभीर सुरक्षाविषयक समस्यांनी ग्रासलेला असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान सुमारे ४५ किलोमीटर लांबीचा हा घाट नागमोडी वळणे, तीव्र उतार, अरुंद रस्ते आणि खोल दऱ्यांसाठी ओळखला जातो. महाबळेश्वरहून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला याच घाटातून प्रवास करावा लागतो. निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला हा घाट अनेकदा अपघातांचे केंद्र ठरत असल्याने त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नागरिकांच्या मते, अलीकडील दुर्घटना पोलादपूर हद्दीत घडली असली तरी सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील घाटमार्गाची स्थितीही अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना सातारा जिल्ह्याच्या हद्दीत घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः महाबळेश्वर ते प्रतापगड दरम्यानच्या घाटरस्त्यावर अनेक ठिकाणी संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत असून काही ठिकाणी त्यांची दुरुस्तीही झालेली नाही.

काही वर्षांपूर्वी तुटलेल्या सिमेंटच्या कठड्यांच्या जागी प्रशासनाने पत्र्याचे कठडे बसवून तात्पुरती उपाययोजना केली होती. मात्र आज त्या पत्र्याच्या कठड्यांचीही दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी ते वाकलेले किंवा तुटलेले दिसून येतात. खोल दरीच्या कडेला असलेल्या या धोकादायक ठिकाणी प्रभावी आणि मजबूत संरक्षण व्यवस्था उभारण्याऐवजी तात्पुरत्या उपायांवर भर दिला जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पर्यटक आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाची ही भूमिका गंभीर प्रश्न निर्माण करणारी असल्याचे मत व्यक्त होत आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे महाबळेश्वर तालुकाप्रमुख शंकर ढेबे यांनी या विषयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, आंबेनळी घाटातील धोकादायक ठिकाणी तातडीने मजबूत संरक्षक कठडे उभारावेत तसेच संपूर्ण घाटमार्गावर रस्त्याच्या दुतर्फा परावर्तक (रिफ्लेक्टर) बसवावेत. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आठ निष्पाप युवकांचा जीव गेल्यानंतरही प्रशासनाला जाग येत नसेल तर ती अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन होणार असून आंबेनळी घाटात मुसळधार पाऊस, दाट धुके आणि कमी दृश्यता ही नेहमीची परिस्थिती असते. अशा काळात वाहनचालकांना मार्गदर्शन करणारे रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक, मजबूत कठडे आणि सुरक्षाव्यवस्था अत्यावश्यक ठरते. मात्र घाटातील अनेक ठिकाणी या सुविधांचा अभाव असल्याची तक्रार वारंवार होत आहे.

आठ युवकांच्या मृत्यूने संपूर्ण राज्य हळहळले असताना आता केवळ शोक व्यक्त करण्यापेक्षा ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा भविष्यात आणखी एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणांवर येईल, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आंबेनळी घाटातील सुरक्षेच्या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मजबूत कठडे, रिफ्लेक्टर, चेतावणी फलक आणि आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी एकमुखी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl