दुधगाव आरोग्य उपकेंद्र रखडले; मंजुरीला आठ महिने उलटूनही कामाचा पत्ता नाही, नागरिकांमध्ये संताप
दुधगाव आरोग्य उपकेंद्र रखडले; मंजुरीला आठ महिने उलटूनही कामाचा पत्ता नाही, नागरिकांमध्ये संताप
प्रतापगड प्रतिनिधी,
ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने दुधगाव (ग्रामीण महाबळेश्वर) येथे आरोग्य उपकेंद्राला ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मंजुरी देण्यात आली होती. अनेक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध स्तरांवरील अथक पाठपुराव्यामुळे ही मान्यता मिळाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मंजुरी मिळून तब्बल आठ महिने उलटून गेले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आरोग्य उपकेंद्र मंजूर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि संघटनांकडून “ही मंजुरी आपणच आणली” असे दावे करण्यात आले. श्रेयवादाची स्पर्धा रंगली, अभिनंदनाचे फलक झळकले, सोशल मीडियावर पोस्टचा पाऊस पडला; मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत कामाचा एकही टप्पा पुढे सरकलेला दिसत नाही. “अजून एक खड्डाही खोदलेला नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
दुधगावसह झांजवड, चतुरबेट, गोरोशी, देवळी, घोणसपूर, दाभे आदी परिसरातील नागरिकांना प्राथमिक उपचारांसाठी मोठ्या अंतराचा प्रवास करावा लागतो. विशेषतः महिला, गर्भवती माता, ज्येष्ठ नागरिक आणि आपत्कालीन रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे या भागासाठी आरोग्य उपकेंद्र ही अत्यंत महत्त्वाची गरज मानली जात होती. मंजुरीनंतर नागरिकांना आता आरोग्य सुविधांचा मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र आजही परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
मंजुरीनंतर प्रशासन स्तरावर आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्या का, निधी उपलब्ध झाला आहे का, जागेचा प्रश्न निकाली निघाला का, बांधकामाचा आराखडा तयार झाला का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. ग्रामस्थांच्या मते, मंजुरीनंतर मोठ्या घोषणा करण्यात आल्या; मात्र त्यानंतर कामाच्या प्रगतीबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
परिसरातील नागरिकांमध्ये अशीही भावना व्यक्त होत आहे की, राजकीय साठेमारीमुळे अत्यंत कठीण प्रयत्नांतून मिळालेली मंजुरीही रखडत चालली असून, ७५ वर्षांनंतरही ग्रामीण भागातील लोकांची आरोग्यविषयक परिस्थिती बदलणार नाही की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
दुधगाव परिसरातील नागरिकांनी आता प्रशासनाने तातडीने या कामाची अंमलबजावणी सुरू करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा हा अत्यंत संवेदनशील विषय असून, मंजुरीनंतरही काम रखडणे ही गंभीर बाब असल्याची भावना संपूर्ण परिसरातून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment