प्रतापगडावर आज पालकमंत्र्यांचा पाहणी दौरा; विकासकामांचा होणार सविस्तर आढावा
प्रतापगडावर आज पालकमंत्र्यांचा पाहणी दौरा; विकासकामांचा होणार सविस्तर आढावा
प्रतापगड | प्रतिनिधी
ऐतिहासिक किल्ले प्रतापगड येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज, शनिवार दि. १६ मे २०२६ रोजी राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण पाहणी दौरा आणि आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सातारा तसेच पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून याबाबत अधिकृत आदेश व सुधारित बैठक नोटीस जारी करण्यात आली आहे.
आदेशानुसार सकाळी १०.३० वाजता प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात येणार असून त्यानंतर सकाळी ११.३० वाजता आढावा बैठक होणार आहे. ही बैठक प्रत्यक्ष किल्ले प्रतापगड परिसरातच आयोजित करण्यात आली असून संबंधित सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या बैठकीत प्रतापगड परिसरातील सुरू असलेली विकासकामे, पर्यटनविषयक सुविधा, ऐतिहासिक वास्तू संवर्धन, रस्ते, सार्वजनिक बांधकामे, वनविभागाशी संबंधित बाबी, पर्यटन वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच स्थानिक पातळीवरील विविध प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बैठकीसाठी जिल्हाधिकारी सातारा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, जिल्हा पोलीस अधीक्षक, राज्य पुरातत्व विभागाचे संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कला व सांस्कृतिक विभागाचे उपसचिव, उपवनसंरक्षक, उपविभागीय अधिकारी वाई, प्रादेशिक पर्यटन अधिकारी पुणे, जिल्हा नियोजन अधिकारी, तहसीलदार महाबळेश्वर, महाबळेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना अद्ययावत टिपण्या, आवश्यक शासन निर्णयांच्या प्रती आणि संबंधित माहितींसह बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बैठकीचे इतिवृत्त पर्यटन विभागाने तयार करून पाच दिवसांच्या आत पालकमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
प्रतापगड हा राज्याच्या पर्यटन आणि ऐतिहासिक वारशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा किल्ला मानला जात असल्याने या बैठकीकडे प्रशासन, स्थानिक नागरिक, पर्यटन व्यावसायिक आणि इतिहासप्रेमी यांचे लक्ष लागले आहे. बैठकीनंतर प्रतापगड परिसरातील विकासकामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment