बस प्रवासातील महिलांना गुंगी देऊन लुटणारा आरोपी जेरबंद; सातारा पोलिसांची तत्पर कारवाई

बस प्रवासातील महिलांना गुंगी देऊन लुटणारा आरोपी जेरबंद; सातारा पोलिसांची तत्पर कारवाई

चार दिवसांची पोलीस कोठडी 

महाबळेश्वर प्रतिनिधी — 

बस प्रवास करणाऱ्या महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना गुंगीकारक औषध देत दागिने व मोबाईल लुटणाऱ्या आरोपीला सातारा पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणामुळे प्रवासी महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असताना पोलिसांच्या जलद तपासामुळे आरोपीला गजाआड करण्यात यश आले आहे.

महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ३६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(२) व ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २८ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सातारा ते महाबळेश्वर या एस.टी. बस प्रवासादरम्यान आरोपी सतीश रामभाऊ बोऱ्हाडे उर्फ संदीप याने लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिच्याशी ओळख वाढवली. विश्वास संपादन केल्यानंतर पिण्याच्या पाण्यात गुंगीकारक द्रव्य देऊन तिच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्याचे मंगळसूत्र व व्हिओ कंपनीचा मोबाईल असा एकूण अंदाजे १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

गुन्हा दाखल होताच सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर यांनी तत्काळ तपास पथक सक्रिय केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपासासोबतच सातारा व महाबळेश्वर येथील एस.टी. स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने छाननी केली.

तपासादरम्यान आरोपी विविध जिल्ह्यांत फिरत असल्याचे उघड झाले. रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे, कल्याण-भिवंडी, धुळे, अहिल्यानगर व नाशिक अशा ठिकाणी तो सतत स्थान बदलत होता. अखेर पोलिसांनी सापळा रचत पुण्यातील खराडी-चंदननगर परिसरातून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून केवळ या गुन्ह्यातील मुद्देमालच नव्हे तर एकूण सुमारे ३ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपीस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, महाबळेश्वर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, आरोपीने यापूर्वी अशाच प्रकारचे आणखी किती गुन्हे केले आहेत याचा तपास सुरू असून इतरत्रही अशा घटना घडल्या असल्यास संबंधितांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl