“महाबळेश्वरच्या विकासाला विरोधकांचा खोडा; लॉडविक पॉईंट रस्ता कामावरून नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचा जोरदार पलटवार”
“महाबळेश्वरच्या विकासाला विरोधकांचा खोडा; लॉडविक पॉईंट रस्ता कामावरून नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचा जोरदार पलटवार”
महाबळेश्वर | प्रतिनिधी :
महाबळेश्वर शहरातील आर.आर. हेरिटेज ते लॉडविक पॉईंट या महत्त्वाच्या पर्यटन रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामावरून सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. विरोधी गटाचे नगरसेवक कुमार शिंदे यांनी या कामाच्या दर्जाबाबत उपस्थित केलेल्या शंकांना नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांवरच विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा आरोप केला आहे.
नगराध्यक्षांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले की, संबंधित रस्त्याचे काम सर्व तांत्रिक निकषांचे पालन करून अत्यंत दर्जेदार पद्धतीने सुरू आहे. विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप हे वस्तुस्थितीपासून दूर असून केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी करण्यात येत आहेत. शहराच्या विकासाचा वेग वाढत असताना काहींना तो सहन होत नसल्यामुळेच अशा प्रकारचे आरोप पुढे केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
रस्त्याच्या काँक्रिटीकरणामध्ये ‘पेव्हर मशीन’चा वापर न झाल्याने काम निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर स्पष्टीकरण देताना नगराध्यक्ष म्हणाले की, प्रत्येक रस्त्यावर मशीनचा वापर शक्य असतोच असे नाही. विशेषतः डोंगराळ भाग, अरुंद वळणे, पर्यटन क्षेत्रातील मर्यादित जागा किंवा भौगोलिक अडचणी असलेल्या ठिकाणी मॅन्युअल काँक्रिटीकरण करावे लागते. राष्ट्रीय महामार्गांसह अनेक मोठ्या रस्ते प्रकल्पांमध्येही अशा पद्धतीचा वापर केला जातो. त्यामुळे केवळ मशीन नसल्याच्या कारणावरून काम निकृष्ट ठरवणे हे अज्ञानाचे लक्षण असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले.
विरोधकांवर टीका करताना नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी मागील सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “गेली पंधरा वर्षे सत्तेत राहून ज्यांना शहरात एक मोठे विकासकाम करता आले नाही, ज्यांच्या काळात शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती, तेच आज विकासकामांवर बोट ठेवत आहेत. महाबळेश्वरला विकासाच्या बाबतीत अनेक वर्षे मागे टाकणाऱ्या निष्क्रिय कारभाराची जनतेनेच दखल घेत त्यांना नाकारले आहे. आता त्याच वैफल्यातून हे आरोप होत आहेत,” असा घणाघात त्यांनी केला.
नगराध्यक्षांनी पुढे सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. नागरिकांना टिकाऊ, सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणे हेच प्रशासनाचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. “विरोधकांकडून केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि कामात अडथळे निर्माण करण्यासाठी स्टंटबाजी केली जात आहे. मात्र जनतेचा पाठिंबा आमच्यासोबत असून शहराचा कायापालट करण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करणारच,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक अफजल सुतार, रोहित ढेबे, ॲड. संजय जंगम, संगीता वाडकर, विमलताई पार्टे, रवींद्र कुंभारदरे आदी मान्यवर उपस्थित होते.
----------------------------------------------
निधीअभावी रखडलेली कामे आता मार्गी
दरम्यान, बांधकाम समितीचे सभापती अफजल सुतार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रशासकीय काळात शहर परिसरातील तीन महत्त्वाच्या रस्त्यांची कामे मंजूर झाली होती; मात्र निधीअभावी ती रखडली होती. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून ही कामे मार्गी लावली आहेत. मंत्री पाटील यांचे स्वतः या कामांवर लक्ष असून दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा दावाही त्यांनी केला.
Comments
Post a Comment