बेल एअर संचालित ग्रामीण रुग्णालयाला डॉ. दीपक सावंत यांची अचानक भेट; डायलेसिस युनिट देण्याची घोषणा
बेल एअर संचालित ग्रामीण रुग्णालयाला डॉ. दीपक सावंत यांची अचानक भेट; डायलेसिस युनिट देण्याची घोषणा
महाबळेश्वर प्रतिनिधी , दि. २० मे :
महाबळेश्वर येथील बेल एअर संस्थेद्वारे संचालित मोरारजी गोकुळदास ग्रामीण रुग्णालयाची राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा ‘कुपोषण निर्मूलन व संसर्गजन्य आजार नियंत्रण’ कृती दलाचे प्रमुख डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी अचानक भेट देत रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी रुग्णालयात नव्याने उभारण्यात येत असलेल्या डायलेसिस केंद्रासाठी स्वतःच्या माध्यमातून एक डायलेसिस युनिट उपलब्ध करून देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली.
महाबळेश्वरसारख्या दुर्गम डोंगरी तालुक्यात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने काही वर्षांपूर्वी आपण घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट झाल्याचे समाधान व्यक्त करत डॉ. सावंत यांनी बेल एअर प्रशासनाचे कौतुक केले. आज या रुग्णालयातून दुर्गम भागातील नागरिकांसह हजारो पर्यटकांनाही दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळत असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भेटीदरम्यान डॉ. सावंत यांनी रुग्णालयातील आयसीयू, अपघात विभाग, क्ष-किरण विभाग, सोनोग्राफी विभाग, प्रयोगशाळा, बाह्यरुग्ण विभाग तसेच विविध उपचार कक्षांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांशी आस्थेवाईक संवाद साधत उपचारांबाबत माहिती घेतली. रुग्णालयात काही अडचणी अथवा आवश्यक सुविधा प्रलंबित असल्यास थेट संपर्क साधावा, त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडित देशमुख, कार्यालयीन अधीक्षक बाजीराव आंब्राळे, शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू, प्रवीण नाना कदम, सचिन गुजर, महेश शर्मा आदी उपस्थित होते. शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू यांनी शवविच्छेदनासाठी वेळेत डॉक्टर उपलब्ध होत नसल्याची समस्या डॉ. सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर आपण यासंदर्भात पाठपुरावा करून आवश्यक कार्यवाही करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
महाबळेश्वर तालुक्यातील मोरारजी गोकुळदास ग्रामीण रुग्णालयाची अवस्था काही वर्षांपूर्वी अत्यंत दयनीय झाली होती. शासनाच्या दुर्लक्षामुळे येथे डॉक्टर, वैद्यकीय सुविधा व अत्यावश्यक यंत्रसामग्रीचा मोठा अभाव निर्माण झाला होता. अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या होत्या. अनेक मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या, मात्र परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नव्हती.
जुलै २०१७ मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री असताना डॉ. दीपक सावंत यांनी मुसळधार पावसात या रुग्णालयाला अचानक भेट दिली होती. त्या वेळी रुग्णालयात एकही डॉक्टर उपस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. केवळ एक सिस्टर आणि शिपाई उपस्थित असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी त्यांच्यासमोर रुग्णालयाच्या गंभीर समस्यांचा पाढा वाचला होता आणि हे रुग्णालय सक्षम खाजगी संस्थेकडे देण्याची मागणी केली होती.
यानंतर रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटल संस्थेकडे हे रुग्णालय प्रायोगिक तत्त्वावर वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेडक्रॉस संस्थेने प्रस्ताव मान्य केल्यानंतर बेल एअर संस्थेने रुग्णालयाचा ताबा घेत व्यापक सुधारणा सुरू केल्या. ज्येष्ठ समाजसेवक जयसिंग मारीवाला तसेच अनेक उद्योगपती व हॉटेल व्यावसायिकांच्या सहकार्याने निधी उभारून ब्रिटिशकालीन इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे रुग्णालयाला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले असून रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाली आहे.
सध्या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
रुग्णालयातील जुन्या व दुर्लक्षित शवविच्छेदन गृहाची पाहणी करून त्यामध्ये आवश्यक बदल करण्याबाबतही डॉ. सावंत यांनी सूचना केल्या. पुढील काळात दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत अधिकाधिक दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी बेल एअर व्यवस्थापनाने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच रुग्णालयाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांसोबत लवकरच बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment