उपसभापती संजय मोरे यांच्या पुढाकारातून ‘प्लास्टिकमुक्त महाबळेश्वर’ मोहिमेला वेग; १८ मे रोजी तालुकाभर विशेष स्वच्छता अभियान

उपसभापती संजय मोरे यांच्या पुढाकारातून ‘प्लास्टिकमुक्त महाबळेश्वर’ मोहिमेला वेग; १८ मे रोजी तालुकाभर विशेष स्वच्छता अभियान

✍️ जितेंद्र कारंडे,

प्रतापगड | प्रतिनिधी :

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत उघड्यावर साचलेल्या प्लास्टिक कचऱ्याच्या निर्मूलनासाठी महाबळेश्वर पंचायत समितीने तालुकाभर व्यापक विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, दिनांक १८ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘लेगसी प्लास्टिक वेस्ट’ संकलन व स्वच्छता अभियान एकाचवेळी राबविण्यात येणार असून, यासाठी पंचायत समिती प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

पंचायत समिती महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी विजय विभुते यांनी तालुक्यातील ७९ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अधिकृत पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. पंचायत समितीच्या सभापती शकुंतला चोरमले व उपसभापती संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच स्वच्छ भारत अभियान गट समन्वयक विशाल घाडगे हे मोहिमेच्या नियोजन व समन्वयाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गावोगावी उघड्यावर पडून असलेला प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची सुरक्षित साठवणूक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संकलित करण्यात आलेल्या प्लास्टिक कचऱ्याची ग्रामपंचायत स्तरावर स्वतंत्र नोंद ठेवण्यात येणार असून, भविष्यात तालुकास्तरीय प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू झाल्यानंतर हा कचरा पुनर्वापरासाठी पाठविण्यात येणार आहे. रस्ते बांधकाम, सिमेंट उद्योग तसेच पुनर्प्रक्रिया उद्योगांसाठी या कचऱ्याचा वापर करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

याशिवाय गावांतील आठवडी बाजारांमध्ये प्लास्टिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार पोलिस प्रशासनाचे सहकार्य घेण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्या दिवसाचा छायाचित्रांसह चित्रीकरण अहवाल पंचायत समितीकडे सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

सदर मोहिमेत ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, शासकीय व निमशासकीय विभागातील कर्मचारी, युवक मंडळे, सामाजिक संस्था तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी स्वतः मोहिमेत उपस्थित राहून स्वच्छता उपक्रम प्रभावीपणे राबवावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

महाबळेश्वरसारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळाच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. प्लास्टिकमुक्त गाव आणि स्वच्छ परिसर निर्माण करण्याच्या दिशेने पंचायत समितीने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl