तापोळा-बामनोली जलाशयात भीषण दुर्घटना!पर्यटकांची स्पीड बोट पलटी; पती-पत्नीचा थरारक बचाव, चालक मात्र बेपत्ता
तापोळा-बामनोली जलाशयात भीषण दुर्घटना!
जोरदार वादळात पर्यटकांची स्पीड बोट पलटी; पती-पत्नीचा थरारक बचाव, चालक मात्र बेपत्ता
तापोळा | वार्ताहर
सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या आणि ‘मिनी काश्मीर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तापोळा-बामनोली परिसरात बुधवारी (दि. १३) सायंकाळी भीषण जलदुर्घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीड बोट अचानक जोरदार वादळात पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत मुंबई येथील पर्यटक पती-पत्नी सुदैवाने सुखरूप बचावले, मात्र बोटीचा चालक पाण्यात बेपत्ता झाला असून उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील एक दाम्पत्य पर्यटनासाठी तापोळा येथे आले होते. तापोळा-बामनोली जलाशयातील प्रसिद्ध बोटिंगचा आनंद घेण्यासाठी त्यांनी स्पीड बोटीतून फेरफटका मारण्यास सुरुवात केली होती. कोयना धरणाच्या विस्तीर्ण छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात सोनाडी-सावरी पुलाजवळ बोट पोहोचली असताना अचानक हवामानात मोठा बदल झाला. परिसरात जोरदार वादळी वारे सुरू झाले. काही क्षणांतच बोटीचा तोल गेला आणि बोट जलाशयात पलटी झाली.
दुर्घटना इतकी अचानक घडली की पर्यटकांना काही काळ काय झाले हेच समजले नाही. मात्र सुदैवाने पर्यटक दाम्पत्याने लाईफ जॅकेट परिधान केले होते. त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान राखत पोहत किनाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, परिसरातील इतर बोट चालक, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर पर्यटक दाम्पत्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
मात्र बोटीचा चालक जलाशयातील खोल पाण्यात बेपत्ता झाला. घटनेनंतर तापोळा आणि परिसरातील विविध बोट क्लब, स्थानिक बोट चालक, ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. अंधार, खोल पाणी आणि खराब हवामानामुळे शोधकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
दरम्यान, दुर्घटनेदरम्यान परिसरात आलेल्या जोरदार वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची माहितीही समोर आली आहे. काही ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. या अचानक बदललेल्या हवामानामुळेच बोट दुर्घटना घडल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. मात्र याबाबत अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पुढील तपास सुरू केला आहे. बोट पलटण्यामागील नेमके कारण, हवामानाचा परिणाम, बोटीची क्षमता आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी केली जात आहे.
तापोळा-बामनोली परिसरातील जलपर्यटन हे महाबळेश्वर तालुक्यातील प्रमुख पर्यटन आकर्षण मानले जाते. दरवर्षी हजारो पर्यटक येथे बोटिंगचा आनंद घेण्यासाठी येतात. मात्र या दुर्घटनेमुळे जलपर्यटनातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हवामानाचा अंदाज, सुरक्षेचे नियम, आपत्कालीन साधने आणि बोट चालकांचे प्रशिक्षण याबाबत अधिक काटेकोर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून होत आहे.
Comments
Post a Comment