राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फेरबदल; प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावे गायब, अजित पवार गटात नव्या नेतृत्वाला संधी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फेरबदल; प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावे गायब, अजित पवार गटात नव्या नेतृत्वाला संधी
मुंबई | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या या नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत पक्षातील ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची नावे नसल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पक्षात मोठे संघटनात्मक बदल सुरू असल्याचे या घडामोडीतून स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दि. २९ एप्रिल २०२६ रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला अधिकृत पत्र पाठवत नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या यादीत नव्या पिढीतील आणि संघटनात्मक पातळीवर सक्रिय असलेल्या चेहऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पक्षात नेतृत्व परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाल्याचे मानले जात आहे.
नव्या कार्यकारिणीत सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षा पदाची जबाबदारी देण्यात आली असून पार्थ पवार यांची सरचिटणीस (पक्ष समन्वय) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जय अजित पवार, अविनाश आदिक, सना मलिक, धीरज शर्मा, संजय प्रजापती, राणा रणवीर सिंह, डॉ. रमन प्रीत सिंह, धनंजय शर्मा आणि डॉ. अभिषेक व्ही. बोकेय यांच्याकडे विविध राष्ट्रीय विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष संघटना आणि राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांना नव्या यादीत स्थान न मिळाल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या तिन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीत मोठा वाटा उचलला असून त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय विश्लेषकांकडून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
राजकीय वर्तुळात या निर्णयाकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या रणनीतीचा भाग म्हणून पाहिले जात आहे. अजित पवार गटाकडून पक्षात नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू असून युवा आणि संघटनात्मक चेहऱ्यांवर अधिक भर दिला जात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, या नव्या फेरबदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भविष्यात आणखी राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता असून, ज्येष्ठ नेत्यांची पुढील भूमिका काय असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।
Comments
Post a Comment