वाढदिवसाला समाजसेवेची सुवर्णकिनार; अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चंदन दादा चव्हाण यांचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम ठरला प्रेरणेचा दीपस्तंभ
वाढदिवसाला समाजसेवेची सुवर्णकिनार; अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चंदन दादा चव्हाण यांचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम ठरला प्रेरणेचा दीपस्तंभ
महाबळेश्वर प्रतिनिधी :
आजच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनशैलीत वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष, केक, फटाके आणि औपचारिक शुभेच्छांचा कार्यक्रम बनत चालला असताना महाबळेश्वर तालुक्यातील सामाजिक बांधिलकी जपणारे उद्योजक श्री. चंदन दादा सुनीता राजाराम चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसाचे समाजसेवेच्या माध्यमातून केलेले रूपांतर संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. “एक हात मदतीचा” या सामाजिक भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य व आर्थिक सहाय्याचे वाटप करण्यात आले असून कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
पंचायत समिती, महाबळेश्वर येथे अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. समाजातील दुर्बल, वंचित आणि आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी समाजाने संवेदनशीलतेने पुढे येणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आशेचे आणि आनंदाचे अश्रू तरळताना दिसून आले, तर उपस्थितांनाही हा क्षण भावनिक करून गेला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीमती सुनीता राजाराम चव्हाण यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी चंदन दादा चव्हाण यांच्या सामाजिक जाणिवेचे आणि समाजहिताच्या कार्यातील सातत्याचे विशेष कौतुक केले. “समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून प्रकाश निर्माण करणे हीच खरी वाढदिवसाची अर्थपूर्ण भेट आहे,” अशा शब्दांत अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाबळेश्वर तालुक्यात गोरगरिबांचे कैवारी, अनाथांचे नाथ आणि संकटसमयी धावून जाणारे समाजहितैषी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख निर्माण केलेल्या चंदन दादा चव्हाण यांनी यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांमधून आपली समाजसेवेची भूमिका सिद्ध केली आहे. वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून तो निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला. विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य तसेच आर्थिक सहाय्य देताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आत्मविश्वास हा कार्यक्रमाचा सर्वात भावनिक क्षण ठरला.
या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. राजेंद्र शेठ राजपुरे, पंचायत समिती सभापती सौ. शकुंतलाताई चोरमले, जिल्हा नियोजन समिती सदस्य मा. श्री. प्रवीणजी भिलारे, जिल्हा परिषद सदस्य श्री. अजित सपकाळ, पंचायत समिती उपसभापती श्री. संजयजी मोरे, जिल्हा परिषद सदस्य श्री. संजय केळगणे, पंचायत समिती सदस्या सौ. वंदनाताई भिलारे, माजी सभापती श्री. संजूबाबा गायकवाड, पंचायत समिती सदस्य श्री. संजयजी शेलार, तहसीलदार श्री. सचिन मस्के, गटविकास अधिकारी श्री. विजयजी विभुते, गटशिक्षणाधिकारी मा. श्री. रमेशजी गंवरे, पोलीस निरीक्षक श्री. बापूसाहेब सांडभोर, उद्योजक श्री. सचिन पप्पू शेठ उतेकर तसेच उद्योजक श्री. अशोक दादा सपकाळ यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी आणि उत्स्फूर्त सूत्रसंचालन विष्णू ढेबे यांनी केले. त्यांच्या ओघवत्या शैलीमुळे कार्यक्रमाला अधिक रंगत प्राप्त झाली. महाबळेश्वर तालुक्यातील तब्बल १०५ गावांमधून समाज बांधवांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “एक हात मदतीचा” या उपक्रमाने केवळ आर्थिक मदत न देता समाजात माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ करण्याचे कार्य केले. समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने आपल्या आनंदाच्या क्षणांमध्ये गरजूंना आधार देण्याची प्रेरणा या उपक्रमातून मिळत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा क्षण न राहता समाजातील गरजूंच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारा दिवस ठरू शकतो, हे चंदन दादा चव्हाण यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. “एक हात मदतीचा” हा उपक्रम महाबळेश्वर तालुक्यात सामाजिक ऐक्य, माणुसकी आणि शिक्षणप्रेमाचा संदेश देणारा ठरला असून भविष्यात अशा सामाजिक उपक्रमांची चळवळ अधिक व्यापक व्हावी, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment