ट्रॅफिकच्या प्रश्नावर नगरसेवक रस्त्यावर; पोलिसांची निष्क्रियता पुन्हा चर्चेतमस्जिद रोडवरील नो एन्ट्रीतून दुचाकींचा सुळसुळाट; रवींद्र कुंभारदरे यांच्या हस्तक्षेपाने काही मिनिटांत वाहतूक सुरळीत
ट्रॅफिकच्या प्रश्नावर नगरसेवक रस्त्यावर; पोलिसांची निष्क्रियता पुन्हा चर्चेत
मस्जिद रोडवरील नो एन्ट्रीतून दुचाकींचा सुळसुळाट; रवींद्र कुंभारदरे यांच्या हस्तक्षेपाने काही मिनिटांत वाहतूक सुरळीत
महाबळेश्वर प्रतिनिधी :
पर्यटननगरी महाबळेश्वरमध्ये वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक आणि पर्यटक हैराण झाले असताना, मस्जिद रोड परिसरातील नो एन्ट्री नियमाचे सातत्याने होणारे उल्लंघन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याने अखेर नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रणाची धुरा सांभाळल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले.
महाबळेश्वर शहरातील मस्जिद रोड हा पर्यटन हंगामात अत्यंत वर्दळीचा मार्ग मानला जातो. या मार्गावर नो एन्ट्रीचे स्पष्ट नियम असतानाही अनेक दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने प्रवेश करत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत पर्यटकांची मोठी गर्दी असताना दुचाकींच्या या बेशिस्त वाहतुकीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून स्थानिक नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा वादविवाद, शाब्दिक चकमकी आणि किरकोळ भांडणांचे प्रकार घडतात. याबाबत अनेक वेळा पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले, मात्र परिस्थितीत कोणताही ठोस बदल दिसून आला नाही. परिणामी नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर उभे राहत नो एन्ट्रीतून येणाऱ्या दुचाकींना अडवून परत पाठवण्यास सुरुवात केली. त्यांच्या या प्रयत्नांना निलेश शेटे, संदीप शिंदे, सैफ वारुणकर आणि पृथ्वीराज भिसे यांनीही सक्रिय सहकार्य केले. नागरिकांच्या या संयुक्त प्रयत्नामुळे काही वेळातच परिसरातील वाहतूक सुरळीत झाली आणि वाहनांची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी असताना प्रत्यक्ष रस्त्यावर नागरिक आणि लोकप्रतिनिधींनाच उतरावे लागत असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, या प्रश्नाबाबत निवेदन देण्यासाठी काही स्थानिक नागरिक पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना "दुचाकींना नो एन्ट्रीत प्रवेश आहे" असे उत्तर मिळाल्याचा दावा करण्यात आला. या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये आश्चर्य आणि हशा निर्माण झाला. वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेलाच नियमांची स्पष्ट माहिती नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नो एन्ट्रीत प्रवेश करणाऱ्या वाहनांवर काही दिवस सातत्याने आणि कठोर कारवाई केल्यास हा प्रश्न कायमस्वरूपी नियंत्रणात येऊ शकतो. मात्र प्रत्यक्ष वाहतूक व्यवस्थापन करण्याऐवजी क्रेन आणि जामरच्या माध्यमातून वाहनांवर कारवाई करून दंड वसुलीवर अधिक भर दिला जात असल्याची टीकाही नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे वाहतूक शिस्त राखणे हा उद्देश आहे की केवळ दंड वसुली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी दाखविलेल्या तत्परतेचे आणि नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, अशी भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे. पर्यटननगरी महाबळेश्वरची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि शिस्तबद्ध करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
प्रतिक्रिया :
"काही मिनिटे रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियंत्रण केल्याने कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली. हेच काम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक पोलिसांनी नियमितपणे केल्यास हा प्रश्न निर्माणच होणार नाही."
— निलेश शेटे, मस्जिद रोड रहिवासी.
Comments
Post a Comment