ग्रामीण पत्रकारितेला मिळाला युवा चेहरा; वैष्णव ढमाळ यांची खंडाळा तालुका अध्यक्षपदी निवड
ग्रामीण पत्रकारितेला मिळाला युवा चेहरा; वैष्णव ढमाळ यांची खंडाळा तालुका अध्यक्षपदी निवड
सामाजिक बांधिलकी, जनसंपर्क आणि पत्रकारितेतील कार्याची दखल; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
प्रतिनिधी : पांडुरंग कुंभार
खंडाळा तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत सामाजिक बांधिलकी जपणारे युवा पत्रकार वैष्णव मनोज ढमाळ यांची द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या खंडाळा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पत्रकारिता क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वैष्णव ढमाळ यांनी अत्यंत कमी वयात पत्रकारिता क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या समस्या, प्रशासनातील त्रुटी, युवकांचे प्रश्न, सामाजिक उपक्रम तसेच लोकहिताचे विषय सातत्याने माध्यमांसमोर आणण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यात एक अभ्यासू, धडाडीचे आणि समाजाभिमुख पत्रकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.सध्या ते महाराष्ट्र रक्षक न्यूज या वृत्तवाहिनीचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक विषयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. विविध गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या समजून घेणे, गरजू कुटुंबांना मदत करणे, युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी काम करणे यामुळे त्यांनी अल्पावधीतच मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे.
द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या हक्कासाठी लढा देणे, पत्रकारांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणे तसेच पत्रकारितेला अधिक सक्षम आणि प्रभावी बनवण्याचे कार्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर वैष्णव ढमाळ यांची खंडाळा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
ही निवड संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अन्सार शेख, राज्याध्यक्ष शकील मनीयार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सातारा जिल्हाध्यक्ष पत्रकार पांडुरंग कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वैष्णव ढमाळ यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक वेगाने वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना वैष्णव ढमाळ म्हणाले, “द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य खंडाळा तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. पत्रकारांच्या हक्कासाठी लढा देतानाच युवक पत्रकारांना संघटनेशी जोडून पत्रकारितेला नवी दिशा देण्याचे काम करणार आहे. संघटनेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करेन.”
त्यांच्या या निवडीचे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, युवक, राजकीय पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले असून पुढील सामाजिक व पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment