तापोळा येथे महावितरणच्या तरुण कर्मचाऱ्याची आत्महत्या; २४ वर्षीय विद्युत सहाय्यकाच्या निधनाने हळहळ

तापोळा येथे महावितरणच्या तरुण कर्मचाऱ्याची आत्महत्या; २४ वर्षीय विद्युत सहाय्यकाच्या निधनाने हळहळ

महाबळेश्वर प्रतिनिधी :

महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा परिसरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून, महावितरण कंपनीत कार्यरत असलेल्या २४ वर्षीय तरुण कर्मचाऱ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महावितरण विभागासह तापोळा परिसरात शोककळा पसरली असून, तरुणाच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कुणाल जोगेश्वर मेश्राम (वय २४, मूळ रा. केशोरी, जि. गोंदिया) असे मृत तरुणाचे नाव आहे. कुणाल हा महावितरण कंपनीच्या तापोळा शाखेत ‘विद्युत सहाय्यक’ म्हणून कार्यरत होता. नोकरीच्या निमित्ताने तो तापोळा बाजारपेठ येथील एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता. अत्यंत शांत, मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष स्वभावामुळे तो सहकाऱ्यांमध्ये परिचित होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दि. १२ मे २०२६ रोजी दुपारी १२:४४ ते २:२० या कालावधीत कुणाल याने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर स्थानिकांनी आणि सहकाऱ्यांनी पाहणी केली असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय, महाबळेश्वर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेची माहिती तापोळा शाखेचे सहाय्यक अभियंता सचिन बाबुराव यादव यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (अ.म.रजि. नं. १२/२०२६) केली आहे.

घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस हवालदार कांबळे (बक्कल नं. ८१७) करत आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कुणाल नोकरीच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यात दाखल झाला होता. कमी वयात मिळालेली नोकरी, भविष्याची स्वप्ने आणि आयुष्याची उमेद घेऊन जगणाऱ्या या तरुणाने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने सहकारी कर्मचारी, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे. तापोळा परिसरात दिवसभर या घटनेचीच चर्चा सुरू होती.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl