नंदीच्या रूपात धावला ‘तारणहार’! बैलाच्या धडकेमुळे वाचले तिघांचे प्राण; क्षणार्धात कोसळले गुलमोहराचे झाड
नंदीच्या रूपात धावला ‘तारणहार’! बैलाच्या धडकेमुळे वाचले तिघांचे प्राण; क्षणार्धात कोसळले गुलमोहराचे झाड
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी येथील रुद्र स्नॅक सेंटर आणि बेकरी परिसरात घडलेल्या एका थरारक आणि चमत्कारिक घटनेची सध्या संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. एका बैलाने अचानक भरधाव बलेरो गाडीला धडक दिल्याने गाडीचा वेग मंदावला आणि काही क्षणांतच गाडीच्या समोर मोठे गुलमोहराचे झाड रस्त्यावर कोसळले. या अनपेक्षित प्रकारामुळे गाडीत बसलेल्या तिघांचे प्राण थोडक्यात बचावले असून, “नंदीच्या रूपातच बैल धावून आला आणि जीव वाचवला,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हारोशी गावचे बापू उतेकर आणि त्यांचे कुटुंबीय बलेरो गाडीतून हारोशीहून कुंभरोशीकडे येत होते. सायंकाळच्या सुमारास ते रुद्र स्नॅक सेंटर आणि बेकरी परिसरात पोहोचले असता अचानक एक बैल रस्त्यावर धावत आला आणि त्याने गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ गाडीचा वेग कमी केला आणि वाहनावरील नियंत्रण कायम ठेवले.
मात्र या घटनेनंतर अवघ्या काही क्षणांतच गाडीच्या अगदी समोर असलेले मोठे गुलमोहराचे झाड जोरदार आवाज करत रस्त्यावर कोसळले. हा संपूर्ण प्रकार इतक्या वेगाने घडला की काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जर बैलाने गाडीला धडक दिली नसती आणि वाहन त्याच वेगात पुढे गेले असते, तर गाडी थेट त्या झाडाखाली आली असती आणि मोठी जीवितहानी झाली असती, अशी चर्चा घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती.
घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र स्थानिक नागरिक, प्रवासी आणि परिसरातील युवकांनी तत्काळ धाव घेत रस्त्यावर कोसळलेले गुलमोहराचे मोठे झाड बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळातच झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
या संपूर्ण घटनेनंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून अनेकांनी याला दैवी संकेत मानले आहे. “नंदीच्या रूपाने बैल समोर आला आणि तिघांचे प्राण वाचले,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही, त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कुंभरोशी परिसरात दिवसभर या चमत्कारिक घटनेची चर्चा रंगली होती. अनेकांनी या प्रसंगाला “मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आलेला अनुभव” असे संबोधत आश्चर्य व्यक्त केले.
Comments
Post a Comment