कामगार दिनी एसटी कर्मचाऱ्यांचा गौरव; महाबळेश्वर रोटरी क्लबचा प्रेरणादायी उपक्रम
कामगार दिनी एसटी कर्मचाऱ्यांचा गौरव; महाबळेश्वर रोटरी क्लबचा प्रेरणादायी उपक्रम
महाबळेश्वर प्रतिनिधी :
सेवाभावी उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर रोटरी क्लबच्यावतीने महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधत एसटी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) महाबळेश्वर आगारात आयोजित या कार्यक्रमात आगर व्यवस्थापक महेश जाधव, वाहक संतोष सावंत, चालक मंगेश सोनवणे तसेच कार्यशाळा सहाय्यक जयवंत वायदंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय व प्रामाणिक सेवेसाठी विशेष सन्मान देण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय काळे यांनी भूषविले, तर सचिव महेश कोमटी यांच्यासह इतर सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान बोलताना अध्यक्ष विजय काळे यांनी महाबळेश्वर एसटी डेपोचे कार्य “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या तत्त्वावर आधारित असल्याचे सांगितले. दुर्गम भागातही प्रवाशांना सुरक्षित, नियमित व दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी ज्या निष्ठेने काम करत आहेत, ते अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
रोटरी क्लबचे सचिव महेश कोमटी तसेच इतर सदस्यांनी आपल्या मनोगतातून एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीचा गौरव करत, प्रवाशांच्या वतीने त्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे सत्कार कार्यक्रम कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा देतात आणि समाजात त्यांच्या योगदानाची जाणीवही दृढ करतात.
या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे सदस्य शिरीष गांधी, प्रा. गणेश कोरे, स्वाती भांगडिया, ब्रिजभूषण सिंग, धीरेन नागपाल, अधिकारी महेश शिंदे यांच्यासह एसटीचे कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे कामगार दिनाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, सेवाभावी कर्मचाऱ्यांचा सन्मान करून समाजात सकारात्मक संदेश देण्यात आला.
Comments
Post a Comment