महाबळेश्वर ‘उजाड’ करण्याचा डाव? मेटतळे परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोडीवर गुन्हे; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

महाबळेश्वर ‘उजाड’ करण्याचा डाव? मेटतळे परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोडीवर गुन्हे; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

प्रतापगड प्रतिनिधी 

 निसर्गसंपन्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात बेकायदेशीर वृक्षतोड आणि उत्खननाचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मेटतळे परिसरात विनापरवाना शेकडो झाडांची तोड आणि खडसनी छाटणी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, या कारवाईमुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महाबळेश्वर शहरालगत असलेल्या मेटतळे परिसरात अनिल रामचंद्र मोरे (वय ६३), दिगंबर द्यानदेव पाटील (वय ५८) आणि विनय अशोक छुगेरा (वय ४२, रा. पुणे) यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनींवर कोणतीही शासकीय परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड व छाटणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तलाठी मनिषा बाळकृष्ण भोसले यांच्या तक्रारीवरून या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणात मोरे यांच्या सर्वे क्रमांक २/३ मधील ०.६० हेक्टर क्षेत्रात तब्बल १९६ झाडांची खडसनी छाटणी करण्यात आली होती. यात रामेटा, छोटी पांगळ, नेचा, अंजन आणि गेळा यांसारख्या वृक्षांचा समावेश आहे. तर पाटील यांच्या सर्वे क्रमांक १४/४ मधील ०.३६ हेक्टर क्षेत्रात ९० झाडांची विनापरवाना छाटणी करण्यात आल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाले आहे. यामध्ये पिसा, अंजन, नेचा आणि गेळा या वृक्षांचा समावेश आहे.

दरम्यान, छुगेरा यांच्या सर्वे क्रमांक १/५ अ आणि १/५ ब या मिळकतींमध्ये मिळून तब्बल २२० झाडे व झुडपे तोडण्यात आल्याचे समोर आले आहे. नेचा, रामेटा आणि निरगुडी यांसारख्या वनस्पतींची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली असून, या सर्व प्रकरणांचे पंचनामेही पूर्ण झाले आहेत.

महाबळेश्वरसारख्या पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील भागात अशा प्रकारे सर्रास वृक्षतोड आणि जमीन सपाटीकरणाच्या नावाखाली उत्खनन सुरू असल्याने निसर्गवैभव धोक्यात येत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः मेटतळे आणि तापोळा परिसरात सातत्याने अशा घटना घडत असताना संबंधित यंत्रणा केवळ कागदोपत्री कारवाई करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदार सचिन मस्के यांना दिले होते. यासोबतच तहसीलदारांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र केवळ गुन्हे दाखल करून थांबणार की पुढे ठोस कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाबळेश्वर तालुक्यात धनिकांकडून जमिनी खरेदी करून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि उत्खनन सुरू असल्याचे चित्र समोर येत असून, “महाबळेश्वर उजाड करण्याचा डाव” रचला जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिकांना हाताशी धरून सुरू असलेल्या या बेकायदेशीर कामांवर प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला नाही, असेही बोलले जात आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या भागात प्रशासनाने केवळ पंचनाम्यांपुरती मर्यादित कारवाई न करता कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा, महाबळेश्वरचे निसर्गवैभव कायमचे धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl